Ghaziabad Transport Hub: देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि व्यस्त शहरांपैकी एक असलेल्या गाझियाबादमध्ये आता वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. उत्तर प्रदेशातील पहिले आंतरराज्य बस टर्मिनल (ISBT) साहिबाबाद येथे उभारले जात आहे, जे आधुनिकतेचे नवे पर्व सुरू करणार आहे. हे संपूर्ण बस टर्मिनल विमानतळाच्या धर्तीवर तयार केले जाणार असून, प्रवाशांना प्रीमियम सुविधांचा अनुभव मिळणार आहे.
विमानतळासारख्या सुविधा
UPRTC च्या माहितीनुसार, सुमारे 161 कोटी रुपये खर्चून पीपीपी (Public-Private Partnership) तत्त्वावर बांधले जाणारे हे ISBT पुढील सुविधा देणार आहे : आधुनिक भव्य इमारत, एस्केलेटर आणि लिफ्ट, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड, AC वेटिंग लाउंज, फूड कोर्ट, प्रशस्त पार्किंग, डिजिटल तिकीटची सुविधा, आधुनिक शौचालय व्यवस्था, उच्च दर्जाची सुरक्षा प्रणाली. प्रवाशांना हे ठिकाण बस टर्मिनलपेक्षा मिनी-एअरपोर्ट असल्याची अनुभूती देणार आहे.
नेपाळसहीत उत्तर भारतातील राज्यांना बसेस धावणार
सध्या आंतरराज्य बससेवा दिल्लीतील काश्मिरी गेट, आनंद विहार आणि सराय कालेखान ISBTवरून चालवली जाते. पण साहिबाबाद ISBT तयार झाल्यानंतर या महत्वाच्या सेवा गाझियाबादमधूनच सुरू केल्या जाणार आहेत. येथून, उत्तराखंड, बिहार, राजस्थान आणि नेपाळसह संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यासाठी सेवा उपलब्ध होतील. UPRTC आणि मे. आनंद हॅबिटॅट यांच्यातील करारानंतर प्रकल्पाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. कंपनीने साहिबाबाद डेपो वर्कशॉपमध्ये आपले कार्यालय उभारले असून, बांधकाम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील दोन वर्षांत टर्मिनलचे काम पूर्ण होणार असल्याचे संकेत आहेत.
हेही वाचा – SC On SIR: देशभरात राजकीय तणाव वाढला; SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
गाझियाबादचे प्रमुख ट्रान्सपोर्ट हब होण्याकडे वाटचाल
गाझियाबादमध्ये आधीच दोन प्रमुख बस टर्मिनल गाझियाबाद बस टर्मिनल आणि कौशाम्बी बस टर्मिनल कार्यरत आहेत. कौशाम्बी टर्मिनल जागेअभावी अडचणीत असतानाच साहिबाबाद ISBTचा प्रकल्प जिल्ह्याच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवस्थेत नव्या युगाची सुरुवात करणार आहे.