Global Navy Ranking 2026: जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांची नवीन रँकिंग 'वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न वॉरशिप्स अँड सबमरीन' (WDMMW) द्वारे नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय नौदलाला पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाही, ही बाब संरक्षण तज्ज्ञांसाठी आश्चर्यकारक मानली जात आहे. केवळ जहाजांची संख्या न मोजता आधुनिकीकरण, लढाऊ क्षमता आणि लॉजिस्टिक सपोर्ट यांसारख्या "ट्रू व्हॅल्यू रेटिंग" (True Value Rating) सूत्राचा वापर करून ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे.
जगातील 5 सर्वात शक्तिशाली नौदलांचे सामर्थ्य
जगातील सर्वात शक्तिशाली नौदलांच्या ताज्या रँकिंगमध्ये अमेरिकेने आपले प्रथम स्थान कायम राखले असून आशियाई देशांनी या यादीत मोठी झेप घेतली आहे. अमेरिकेकडे सध्या 11 विमानवाहू जहाजे आणि अफाट युद्ध क्षमता आहे, ज्यामुळे ते जागतिक स्तरावर अव्वल स्थानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनकडे 370 पेक्षा जास्त जहाजे असून ते जगातील सर्वात वेगाने वाढणारे नौदल मानले जाते. तिसऱ्या स्थानावर रशिया असून त्यांच्याकडे अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे मोठे बळ आहे. चौथ्या क्रमांकावर इंडोनेशीयाने स्थान मिळवले असून त्यांच्या ताफ्यात 245 युद्धनौका आहेत, ज्यांच्या माध्यमातून ते 'ब्लू-वॉटर' क्षमतेवर भर देत आहेत. पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरियाचे नौदल असून त्यांच्याकडे 155 आधुनिक जहाजे आणि 70,000 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मोठी फौज आहे.
हेही वाचा – Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प आता व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात खळबळ
भारत कितव्या क्रमांकावर?
भारतीय नौदल या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. भारताचे रेटिंग 100.5 इतके असून भारताकडे 2 विमानवाहू जहाजे (आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य), 19 पाणबुड्या आणि अरिहंत श्रेणीतील अण्वस्त्र सज्ज पाणबुड्यांचे बळ आहे. इंडोनेशिया आणि दक्षिण कोरिया यांसारखे देश आधुनिकीकरणामुळे भारताच्या पुढे गेले आहेत.
चीन आणि पाकिस्तानची स्थिती
चीनचे नौदल दुसऱ्या क्रमांकावर असले तरी जहाजांच्या संख्येनुसार ते जगातील सर्वात मोठे नौदल ठरले आहे. 2035 पर्यंत 9 विमानवाहू जहाजे बांधण्याचे चीनचे लक्ष्य आहे. या यादीत पाकिस्तान 26 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानकडे सध्या एकही विमानवाहू जहाज नाही, मात्र चीनकडून त्यांना मिळणाऱ्या आधुनिक पाणबुड्यांमुळे भविष्यात त्यांचे रेटिंग बदलू शकते.
रँकिंगचे निकष काय?
WDMMW नुसार, ही यादी केवळ संख्याबळावर आधारित नाही. यामध्ये जहाजांचे वय, आधुनिकीकरण प्रकल्प, हल्ल्याची आणि बचावाची क्षमता, आणि लॉजिस्टिक सपोर्ट या सर्व गोष्टींचा ताळमेळ बसवून 'ट्रू व्हॅल्यू रेटिंग' काढले जाते. रशियाकडे अणुशक्ती असली तरी, चीनच्या वेगवान बांधणीमुळे रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.