Wife Bites Husband's Tongue: पती-पत्नीमधील भांडणे सामान्य असतात, मात्र गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये एका पत्नीने संतापाच्या भरात जे काही केले, त्याने सर्वांनाच हादरा बसला आहे. जेवणावरून झालेल्या वादाचे रूपांतर अशा भयानक हिंसेत झाले की, पत्नीने आपल्या पतीची जीभ चक्क दातांनी तोडली. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा राडा झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
जेवणाची ठिणगी आणि भयानक शेवट
संजयपुरी गावात राहणारा विपिन आणि मेरठची ईशा यांचा विवाह 1 वर्षापूर्वी झाला होता. रविवारी दुपारी जेवण बनवण्यावरून दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली. रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. वादावादी सुरू असताना ईशाने रागाच्या भरात विपिनवर झडप घातली आणि त्याच्या जीभेचा दातांनी जोरात लचका तोडला. या हल्ल्यात जीभेचा काही भाग तुटल्याने विपिन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
रुग्णालयात उपचार आणि सासर-माहेरचा 'हायव्होल्टेज ड्रामा'
विपिनला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची जखम खोल असून त्याला भविष्यात बोलताना कायमची समस्या उद्भवू शकते. ही घटना समजताच ईशाच्या माहेरची मंडळी तिथे पोहोचली. सासरच्या लोकांवर आरोप करत त्यांनी राडा घातला, ज्याचे रूपांतर नंतर लाथाबुक्क्यांच्या हाणामारीत झाले. या तुंबळ वादाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
तक्रारीविना पोलीस पेचात
दरम्यान, एवढा मोठा हिंसाचार होऊनही आश्चर्यकारक बाब म्हणजे अद्याप दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आलेली नाही. एसीपी मोदीनगर यांनी सांगितले की, अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. व्हायरल व्हिडिओ आणि माध्यमांतील बातम्यांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. तक्रार मिळताच गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.