Friday, April 25, 2025 09:30:21 PM

'मशिदीत जाऊन नियोजन केले, नंतर हल्ला केला'; नागपूर हिंसाचार प्रकरणावर विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया

औरंगजेबी मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्ही निदर्शने केली होती. नागपुरातही संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला, त्यानंतर औरंगजेबी मानसिकतेचे लोक तिथे जमले आणि त्यांनी मशिदीत जाऊन एक योजना आखली.

मशिदीत जाऊन नियोजन केले नंतर हल्ला केला नागपूर हिंसाचार प्रकरणावर विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया
Vishwa Hindu Parishad On Nagpur Violence
Edited Image

Vishwa Hindu Parishad On Nagpur Violence: सध्या देशभरात नागपूरात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद उमठताना दिसत आहेत. नागपूरमधील हिंसाचारानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. विनोद बन्सल यांनी म्हटलं आहे की, 'विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने काल महाराष्ट्रातील शेकडो ठिकाणी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी शांततेत निदर्शने केली. नागपुरातही शांततापूर्ण निदर्शने संपल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर सुनियोजित हल्ला करण्यात आला. औरंगजेबी मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्ही निदर्शने केली होती. नागपुरातही संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला, त्यानंतर औरंगजेबी मानसिकतेचे लोक तिथे जमले आणि त्यांनी मशिदीत जाऊन एक योजना आखली. त्या नियोजनात बाहेरील लोकांनाही सोबत घेण्यात आले आणि त्यानंतर थेट हल्ला करण्यात आला.' 

औरंगजेबाची कबर असलेल्या ठिकाणी औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या राजांचे स्मारक बांधावे - 

विनोद बन्सल यांनी पुढे बोलताना सांगितलं की, हल्ल्यादरम्यान पोलिस आणि हिंदूंना ओळखले गेले आणि त्यांना लक्ष्य करण्यात आले. औरंगजेबाची मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा संकल्प आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या ठिकाणी औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या राजांचे मोठे स्मारक बांधावे, अशी आमची मागणी आहे. औरंगजेबाच्या कबरीसह देशातून औरंगजेबाची मानसिकताही काढून टाकावी लागेल, असंही बन्सल यांनी यावेळी नमूद केलं. 

हेही वाचा -  औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला 5 बिघा जमीन आणि 11 लाख रुपये देण्याची घोषणा कोणी केली? 'त्या' व्यक्तीचा शिवसेनेशी आहे खास संबंध

हिंसाचार पसरवण्यासाठी खोट्या अफवांचा वापर - 

दरम्यान, कबरीची सुरक्षा वाढवणे हे सरकारचे काम आहे, पण तेथून कबर काढून टाकली जाईल आणि तिथे औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या राजाचे स्मारक बांधले पाहिजे, अशी मागणी बन्सल यांनी केली. त्यांनी पुढे म्हटलं की, श्लोक जाळण्याची बाब उघड खोटी आहे आणि पूर्णपणे अन्याय्य आहे. विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाचा कोणताही कार्यकर्ता कोणत्याही धर्माविरुद्ध बोलत नाही. हिंसाचार पसरवण्यासाठी खोट्या अफवा पसरवण्यात आल्या. अशा गोष्टी बोलणे हे उघड खोटे आहे. तिथे एक हिरवा कापड होता ज्यावर औरंगजेबाचा फोटो होता, जो कार्यकर्त्यांनी जाळला आणि सर्व काही कॅमेऱ्यासमोर घडले, असा दावाही बन्सल यांनी केला आहे. 

हेही वाचा - 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष भडकला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी - 

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणी एक प्रेस रिलीज जारी केली आहे. प्रसिद्धीपत्रकात, विश्व हिंदू परिषदेने नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या, हिंसाचार करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्या जिहादींवर कठोर कारवाई करावी आणि औरंगजेबाच्या समाधीस्थळी पूज्य धनाजी जाधव, संताजी घोरपडे, छत्रपती राजाराम महाराज जी यांचे स्मारक बांधावे, अशी मागणी केली आहे. 

हिंदू समुदायाच्या अनेक घरांना लक्ष्य - 

याशिवाय, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटना महासचिव मिलिंद परांडे यांनी नागपूर हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटलं की, नागपूरमध्ये काल रात्री एका गटाने केलेल्या जाळपोळ आणि हल्ल्याच्या घटना पूर्णपणे निषेधार्ह आहेत. आमच्या युवा शाखेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ला करण्यात आला, त्यांनी हिंदू समुदायाच्या अनेक घरांना लक्ष्य केले. विश्व हिंदू परिषद या सर्व गोष्टींचा तीव्र निषेध करते.
 


सम्बन्धित सामग्री