India-EU FTA : भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील प्रदीर्घ वाटाघाटींनंतर अखेर ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (FTA) शिक्कामोर्तब झाले आहे. मंगळवारी नवी दिल्लीत झालेल्या 16 व्या भारत-EU शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या कराराची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी या कराराचे वर्णन जागतिक कल्याणासाठी "सामायिक समृद्धीचा आराखडा" असे केले आहे.
2 अब्ज लोकांच्या बाजारपेठेसाठी सुवर्णसंधी
हा केवळ एक व्यापार करार नसून, जगातील दुसरी आणि चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या 2 अब्ज लोकांच्या बाजारपेठेला जोडणारा एक भक्कम पूल आहे. या करारामुळे भारताच्या 99 टक्क्यांपेक्षा जास्त निर्यातीसाठी युरोपचे दरवाजे उघडणार आहेत. एकूण 2,091.6 लाख कोटी रुपयांच्या (24 ट्रिलियन) एकत्रित बाजारपेठेमुळे दोन्ही बाजूंना व्यापार आणि नवनिर्मितीच्या (Innovation) क्षेत्रात अभूतपूर्व संधी मिळणार आहेत.
अशांत जगात स्थिरतेची 'संजीवनी'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "हा करार जागतिक व्यवस्थेला स्थिरता प्रदान करेल. भारत-EU सहकार्य ही केवळ व्यापार भागीदारी नसून ती जागतिक कल्याणासाठीची भागीदारी आहे." युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनीही याला दुजोरा दिला. त्यांनी म्हटलं आहे की, हा करार धोरणात्मक अवलंबित्व कमी करेल आणि असुरक्षित जगाला सुरक्षेची भावना देईल.
हेही वाचा - India EU Trade Deal: ‘युरोप स्वतःच्याच धोरणांना…’; भारत-युरोप संबंधांवर अमेरिका नाराज, 2007 पासून अडकलेला करार अखेर पूर्ण?
व्यापारासोबतच संरक्षण आणि सुरक्षेवरही भर
दरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की, मुक्त व्यापार करारासोबतच (FTA) दोन्ही देशांमध्ये सुरक्षा व संरक्षण भागीदारी आणि मोबिलिटी आणि मायग्रेशन करार हे दोन महत्त्वाचे करार झाले आहेत. सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी करारामुळे दोन्ही देशांमधील लष्करी आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ होतील. तसेच मोबिलिटी आणि मायग्रेशन करार कौशल्य विकास आणि लोकांच्या हालचालींसाठी हा करार एक सर्वसमावेशक चौकट प्रदान करेल.
ऐतिहासिक प्रजासत्ताक दिन सोहळा
युरोपियन युनियनचे नेते भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. परराष्ट्र सचिवांनी या भेटीचे वर्णन 'ऐतिहासिक' असे केले असून, गेल्या दशकात भारत-EU संबंधांनी नवी उंची गाठल्याचे सांगितले. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनीही भारताच्या वाढत्या प्रभावाचे कौतुक केले आणि युक्रेनमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीवर विश्वास व्यक्त केला.
जागतिक आव्हानांवर संयुक्त उत्तर
पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव म्हणाले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि युरोपियन युनियनची भागीदारी द्विपक्षीय संदर्भापलीकडे महत्त्वाची आहे. उत्पादन आणि पुरवठा साखळीचे केंद्रीकरण, वाढती संरक्षणवादी प्रवृत्ती आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन मोठ्या लोकशाही अर्थव्यवस्थांनी एकत्र येणे हे जागतिक लोकसंख्येच्या हिताचे आहे.