Earth Hour: पर्यावरणाचे रक्षण आणि हवामान बदलाच्या संकटाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा 'अर्थ अवर' (Earth Hour) उपक्रम या शनिवारी, 28 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, BSES ने दिल्लीतील आपल्या 53 लाखांहून अधिक ग्राहकांना आणि सुमारे 2.25 कोटी वीज वापरकर्त्यांना रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत अत्यावश्यक नसलेले दिवे आणि विद्युत उपकरणे स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवत BSES स्वतः देखील आपल्या 400 हून अधिक कार्यालयांमधील दिवे या 1 तासासाठी बंद ठेवणार आहे.
'अर्थ अवर'चा इतिहास आणि वाढता सहभाग
'अर्थ अवर' हा WWF (World Wide Fund for Nature) द्वारे राबवला जाणारा एक जागतिक उपक्रम आहे. याची सुरुवात 2007 मध्ये सिडनी येथून झाली. आज हे एका मोठ्या चळवळीत रूपांतरित झाले असून, दिल्लीकर यात दरवर्षी उत्साहाने सहभागी होत आहेत. आकडेवारीनुसार, 'अर्थ अवर' दरम्यान दिल्लीत 2024 मध्ये 206 मेगावॅट आणि 2025 मध्ये 269 मेगावॅट विजेची बचत करण्यात आली होती. यावर्षी हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जनजागृतीसाठी BSES ची व्यापक मोहीम
BSES केवळ वीज बचतीचे आवाहनच करत नाही, तर त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृतीही करत आहे. 'संवाद' या ग्राहक वृत्तपत्राद्वारे 53 लाख ग्राहकांपर्यंत संदेश पोहोचवण्यात आला असून SMS, डिजिटल माध्यमे आणि रहिवासी कल्याण संस्थांच्या (RWAs) मदतीने नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. हवामानातील अनपेक्षित बदल आणि वाढते तापमान यांसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आपली जीवनशैली पृथ्वीशी सुसंगत असणे ही काळाची गरज बनली आहे.
शाश्वत भविष्यासाठी BSES ची कटिबद्धता
BSES ची पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी केवळ 'अर्थ अवर'पुरती मर्यादित नाही. संस्थेने आतापर्यंत, 13,000 घरांच्या छतांवर सौर ऊर्जा जोडण्या (Rooftop Solar) दिल्या आहेत. तसेच 6,300 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्स आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारली आहेत. हरित वीज (Green Electricity) आणि बॅटरी साठवणूक प्रणालीला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे.
WWF-India कडून BSES चे कौतुक
'अर्थ अवर'च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त WWF-India ने BSES च्या दीर्घकालीन भागीदारीचे कौतुक केले आहे. गेल्या 2 दशकांत या चळवळीने व्यक्ती आणि संस्थांना एकत्र आणण्याचे मोठे काम केले आहे. BSES सारख्या संस्थांच्या सक्रिय सहभागामुळे लोकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडत असून शाश्वत जीवनशैलीकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे मत WWF-India ने व्यक्त केले आहे.
हेही वाचा – Hitting Remote : रिमोट आपटल्यावर व्यवस्थित चालतोय? खरं तर यामागे आहे वैज्ञानिक कारण, जाणून घ्या
अर्थ अवर'चे महत्त्व –
जागतिक तापमानात होणारी वाढ (Global Warming) आणि हवामानातील अनपेक्षित बदल यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये जाणीव निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. 'एक तास' ही एक प्रतिकात्मक कृती आहे, जी दर्शवते की आपण निसर्गाचा विचार करत आहोत. जेव्हा लाखो लोक एकाच वेळी अनावश्यक वीज उपकरणे बंद करतात, तेव्हा मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत होते. यामुळे वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा वापर कमी होतो आणि वातावरणात उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साइड कमी होण्यास मदत होते. 'अर्थ अवर' हे सिद्ध करते की जगातील प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने किंवा समुदायाने उचललेले छोटे पाऊल एकत्रितपणे खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. जगभरातील 190 हून अधिक देशांचा यात सहभाग असतो, जो एकतेचा संदेश देतो.