Twisha Sharma Case: माजी मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायालयाने स्वतःहून हे प्रकरण सुनावणीसाठी दाखल करून घेतले. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठासमोर यावर सविस्तर युक्तिवाद झाला. सुनावणी दरम्यान ट्विशाच्या कुटुंबाच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी, एफआयआर (FIR) नोंदवण्यात पोलिसांना झालेला विलंब आणि स्थानिक तपासाच्या संशयास्पद पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
'सासूकडून तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न'; खंडपीठासमोर धक्कादायक युक्तिवाद
सुनावणी दरम्यान सॉलिटिसर जनरल (SG) यांनी खंडपीठाला माहिती दिली की, या प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) आपल्या हाती घेत आहे. मात्र, ट्विशाची सासू गिरीबाला सिंह या आपल्या प्रभावाचा गैरवापर करून तपासात मोठे अडथळे निर्माण करत आहेत. त्या पोलिसांना सहकार्य करत नसून, प्रसारमाध्यमांना दिशाभूल करणाऱ्या मुलाखती देत आहेत, असा आरोप करण्यात आला. गिरीबाला सिंह यांच्या या कथित हस्तक्षेपामुळे आपल्याला स्थानिक पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे हा तपास मध्य प्रदेश राज्याबाहेर केला जावा, अशी आग्रही विनंती ट्विशाच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.
प्रसारमाध्यमांनी सनसनाटीकरण थांबवावे; सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील मूळ सत्यावर बोट ठेवले. न्यायालय म्हणाले, "त्या मुलीने आपला जीव गमावला आहे, मग ती आत्महत्या असो किंवा एखाद्या गुन्ह्याचा परिणाम वस्तुस्थिती हीच आहे की, एका तरुण जिवाचा बळी गेला आहे." ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने निष्पक्ष तपास होण्यासाठी हे प्रकरण तातडीने सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. याच वेळी न्यायालयाने प्रसारमाध्यमांना कडक निर्देश दिले की, या प्रकरणाचे कोणत्याही प्रकारचे सनसनाटीकरण केले जाऊ नये. तसेच टीव्ही वाहिन्यांवर ट्विशाच्या कुटुंबाच्या मुलाखती आणि त्यांची सार्वजनिक विधाने प्रसारित करणे तातडीने थांबवावे.
दोन्ही कुटुंबांना कोर्टाचा सल्ला; तपासाबाबत तूर्तास भूमिका स्पष्ट नाही
सत्य शोधून काढणे ही केवळ तपास यंत्रणेची जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने दोन्ही कुटुंबांना मीडियासमोर जाहीर विधाने करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तपास यंत्रणा स्वतः कुटुंबियांचे जबाब नोंदवेल, असे कोर्टाने सांगितले. ट्विशाच्या कुटुंबीयांना तपास राज्याबाहेर वर्ग करण्याची मागणी करण्याचा पूर्ण अधिकार असला, तरी सध्याच्या प्राथमिक टप्प्यावर न्यायालय या मागणीवर कोणतेही मत व्यक्त करणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असल्याने पोलीस, मीडिया आणि तपास यंत्रणांनी याचे गांभीर्य राखावे, असे आवाहन न्यायालयाने केले.
दिल्लीहून सीबीआयचे पथक भोपाळकडे रवाना; 'SIT' करणार तपास
न्यायालयाच्या निर्देशानंतर या प्रकरणाला वेग आला असून, भोपाळ पोलिसांकडून प्रकरणाचा औपचारिक ताबा घेण्यासाठी दिल्लीहून सीबीआयचे एक विशेष पथक आजच भोपाळकडे रवाना होणार आहे. कटारा हिल्स पोलीस ठाण्यात दाखल झालेली मूळ एफआयआर (FIR) सीबीआय आता आपल्या नावाने पुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करेल. यासाठी सीबीआयच्या दिल्ली आणि मध्य प्रदेश शाखेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक 'विशेष तपास पथक' (SIT) गठीत केले जात आहे. सीबीआय स्थानिक पोलिसांकडून आरोपी समर्थला आपल्या ताब्यात घेणार असून, समर्थचे निवासस्थान, ट्विशाची खोली आणि घटनास्थळाची कसून पाहणी केली जाणार आहे.