अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने लागू केलेल्या नवीन सोशल मीडिया तपासणी धोरणामुळे भारतातील H-1B व्हिसा अर्जदारांना मोठा फटका बसला आहे. अनेक अर्जदारांच्या मुलाखतीच्या वेळा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने मंगळवारी रात्री याबाबत महत्त्वाची सूचना जारी केली. दूतावासाने स्पष्ट केले की ज्या अर्जदारांना त्यांच्या व्हिसा अपॉइंटमेंटचे पुनर्नियोजन झाल्याची ईमेलद्वारे सूचना मिळाली आहे, त्यांनी नव्या तारखेलाच उपस्थित राहावे. जुन्या तारखेला मुलाखतीसाठी दूतावासात आल्यास कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही, असेही दूतावासाने कळवले.
यामुळे अनेक अर्जदारांना अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. Bloombergच्या अहवालानुसार, डिसेंबरच्या मध्यापासून शेवटपर्यंत नियोजित अनेक मुलाखती आता पुढील वर्षी मार्च महिन्यात ढकलण्यात आल्या आहेत. नेमक्या किती नियुक्त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. बिझनेस इमिग्रेशनविषयक वकील Steven Brown यांनी सांगितले की, “Mission India ने पुष्टी केली आहे की पुढील काही आठवड्यांतील अनेक अपॉइंटमेंट्स सोशल मीडिया व्हेटिंगसाठी रद्द करून मार्चमध्ये हलवण्यात आल्या आहेत.”
हेही वाचा: Odisha Social Media Ban: तो मृतदेह मिळाल्यानंतर ओडिशातील मलकानगिरी तणावग्रस्त; सरकारची व्हॉट्सॲप-फेसबुकवापरावर बंदी
अमेरिकन सरकारने H-1B व्हिसा अर्जदार आणि त्यांच्या H-4 कुटुंबीयांसाठी तपासणी प्रक्रिया अधिक कठोर केली आहे. नव्या निर्देशांनुसार सर्व सोशल मीडिया प्रोफाइलची प्रायव्हसी सेटिंग "public" ठेवणे बंधनकारक आहे. 15 डिसेंबरपासून अधिकाऱ्यांकडून अर्जदारांच्या ऑनलाइन उपस्थितीची तपासणी केली जाईल, ज्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका किंवा सार्वजनिक सुरक्षेला जोखीम निर्माण करणारी कोणतीही माहिती असल्यास ती लक्षात घेतली जाईल. विद्यार्थ्यांवर आणि एक्स्चेंज कार्यक्रमातील सहभागीवर अशी तपासणी आधीपासूनच लागू होती.
स्टेट डिपार्टमेंटने स्पष्ट केले की "प्रत्येक व्हिसा तपासणी ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित निर्णयप्रक्रिया असते." H-1B कार्यक्रमावर आधीच वाढती तपासणी सुरू असताना हा नवा नियम अर्जदारांसाठी आणखी आव्हानात्मक ठरणार आहे. याआधी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी नव्या H-1B व्हिसावर 100,000 डॉलरची एकदाच आकारली जाणारी फी लावली होती, ज्याचा भारतीय कामगारांवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो.
याशिवाय, एका अफगाण नागरिकाकडून झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेने 19 “countries of concern” मधून येणाऱ्या ग्रीन कार्ड, नागरिकत्व आणि इतर इमिग्रेशन अर्जांची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. अमेरिकेच्या नव्या धोरणांमुळे परदेशात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसमोर नवीन आव्हाने उभे राहिली आहेत.
हेही वाचा: Australia Social Media Ban: ऑस्ट्रेलियात मुलांसाठी सोशल मीडिया लॉकडाऊन; 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर पूर्ण बंदी