वॉशिंग्टन: जग नव्या वर्षाच्या स्वागतात असतानाच आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर थेट लष्करी कारवाई करत राजधानी ‘काराकस’वर 150 हून अधिक लढाऊ विमानांच्या साहाय्याने बॉम्बवर्षाव केला आहे. ‘ऑपरेशन ॲब्सोल्युट रिझॉल्व्ह’ (Operation Absolute Resolve) अंतर्गत केलेल्या या हल्ल्यात अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन अमेरिकेत नेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेची पुष्टी केली असून, आगामी काळासाठी आता व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिकाच पाहणार असल्याचे जाहीर केले आहे.
स्फोटांनी हादरली राजधानी; मादुरो दाम्पत्य न्यूयॉर्कला रवाना
शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास काराकस शहरात किमान सात मोठे स्फोट झाले. शहरातील सैन्य तळ आणि सरकारी इमारतींवर अमेरिकन विमानांनी कमी उंचीवरून उड्डाणे करत हल्ले चढवले. या हल्ल्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिक दहशतीखाली आहेत. मादुरो यांना अमली पदार्थांची तस्करी (‘नार्को-टेररिझम’) आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यूयॉर्कला नेण्यात आले असून तिथे त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. ट्रम्प यांनी मादुरो यांना ‘हुकूमशहा’ संबोधत ही कारवाई लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
भारताची तेल सुरक्षा संकटात?
अमेरिकेच्या या कारवाईचे थेट पडसाद भारतावर उमटण्याची शक्यता आहे. भारत आपल्या गरजेच्या खनिज तेलापैकी मोठा हिस्सा व्हेनेझुएलाकडून आयात करतो. विशेषतः रिलायन्ससारख्या बड्या तेलशुद्धीकरण कंपन्या व्हेनेझुएलाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करतात. जर हा पुरवठा थांबला, तर भारताला दररोज सुमारे सहा लाख बॅरल तेलाची तूट भासू शकते. अशा परिस्थितीत भारताला मध्य-पूर्व आशिया किंवा कॅनडासारख्या देशांकडून महागडे तेल विकत घ्यावे लागेल, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची भीती आहे.
व्यापाराला मोठा फटका; 600 मिलियन डॉलर अडकले
भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातील व्यापार केवळ तेलापुरता मर्यादित नाही. भारत व्हेनेझुएलाला मोठ्या प्रमाणात स्वस्त औषधे, लसी, रसायने आणि कापड निर्यात करतो. या हल्ल्यामुळे ही निर्यात ठप्प होण्याची शक्यता असून भारतीय औषध कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, भारताची सरकारी कंपनी ‘ओएनजीसी विदेश’ (ONGC Videsh) चे तब्बल 600 मिलियन डॉलर (सुमारे 5000 कोटी रुपये) व्हेनेझुएलात अडकले आहेत. रशिया आणि चीनने या हल्ल्याचा निषेध करत संयुक्त राष्ट्रात आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
लोखंड आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर परिणाम
तेल व्यतिरिक्त भारत व्हेनेझुएलाकडून लोखंडी भंगार (Iron Scrap) आणि ॲल्युमिनियमची मोठी आयात करतो. 2024 च्या आकडेवारीनुसार, भारताने 43.4 मिलियन डॉलरचे लोखंड आणि 36.20 मिलियन डॉलरचे ॲल्युमिनियम तिथून मागवले होते. या धातूंचा वापर भारतातील ऑटोमोबाईल, वीज आणि बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास या उद्योगांच्या खर्चात वाढ होऊ शकते.
ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे ‘वेट अँड वॉच’
भारताने 2024 मध्ये व्हेनेझुएलाकडून 22 मिलियन बॅरल तेल आयात केले होते. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रावर नियंत्रण मिळवल्यास, आगामी काळात भारताला तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या अटी मान्य कराव्या लागतील किंवा नवीन व्यापार मार्ग शोधावे लागतील. भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.