अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारत - पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा अद्याप चर्चेत असतानाच, आता अमेरिकेतल्या US - China Economic and Security Review Commission (USCC) च्या वार्षिक अहवालाने आणखी एक वाद उभा केला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मे 2025 मधील भारत - पाक संघर्षात पाकिस्तानला महत्त्वाचे लष्करी यश मिळाले होते, आणि चीनच्या मदतीने हे शक्य झाले, असे सांगण्यात आले आहे. USCC च्या तब्बल 800 पानांच्या अहवालात पाकिस्तानच्या कथित विजयाचे कौतुक करण्यात आले असून, अनेक माहिती चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याचे भारतीय तज्ज्ञांचे मत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला या अहवालात ‘विद्रोही हल्ला’ असे संबोधण्यात आले आहे. भारतात 26 नागरिकांचा मृत्यू झालेल्या या हल्ल्याला वेगळे रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे.
या अहवालात म्हटले आहे की 7 ते 10 May 2025 दरम्यान झालेल्या भारत - पाक लष्करी संघर्षात चीनने पाकिस्तानला महत्त्वाची माहिती आणि आधुनिक शस्त्रे पुरवून मदत केली. अहवालानुसार पाकिस्तानने चीनच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहून अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना युद्धात ‘लाभ’ मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालात आणखी एक धक्कादायक दावा म्हणजे पाकिस्तानने 6 भारतीय लढाऊ विमाने पाडली, ज्यामध्ये राफेल विमानांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. तथापि, अहवालानुसार केवळ 3 भारतीय विमानांचे नुकसान झाल्याची ‘पुष्टी’ असल्याचे नमूद केले आहे. हे दावे पूर्णपणे पाकिस्तानच्या निवेदनांवर आधारित असल्याचे स्पष्ट दिसून येते.
हेही वाचा: Money Laundering Case: अनिल अंबानींना ED चा मोठा झटका! 1452 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
USCC च्या अहवालात चीनने या संघर्षाचा "स्वतःच्या शस्त्रास्त्रांची चाचणी आणि जाहिरात करण्यासाठी" वापर केल्याचेही म्हटले आहे. भारतासोबतच्या सीमावादांच्या पार्श्वभूमीवर चीनने या परिस्थितीचा फायदा घेतल्याचे सूचित करण्यात आले आहे. हा दावा भारताच्या सुरक्षाविषयक धोरणांवर परिणाम करणारा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा अहवाल सार्वजनिक करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे थेट प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, “अमेरिकन संस्थेचा हा अहवाल भारतासाठी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. पाकिस्तानच्या कथित यशाची वाखाणणी होत असताना भारत सरकार गप्प का आहे?” जयराम रमेश यांनी ट्रम्पच्या दाव्यांचाही उल्लेख केला आणि केंद्र सरकारने या अहवालावर अधिकृत आक्षेप नोंदवावा, अशी मागणी केली. अमेरिकेच्या अहवालातील चुकीचे आणि भ्रामक दावे भारताने कशा पद्धतीने खोडून काढेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: World Boxing Cup Finals : वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारतावर सुवर्णपदकांचा वर्षाव!; चार महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी