Monday, May 11, 2026 11:19:51 AM

IPL 2026: आयुष म्हात्रेनंतर आता हा शतकवीर...; राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; चाहते चिंतेत

वैभवची ही दुखापत पाहिल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ज्ञांना थेट चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) आयुष म्हात्रेची आठवण झाली.

ipl 2026 आयुष म्हात्रेनंतर आता हा शतकवीर राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का चाहते चिंतेत

नवी दिल्ली: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असं म्हणतात ते उगीच नाही. क्षणात तुम्हाला यशाच्या शिखरावर बसवणारा हा खेळ दुसऱ्याच क्षणी जमिनीवर आणून आपटतो, याची प्रचिती काल जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर आली. राजस्थान रॉयल्सचा युवा तडफदार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने कालच्या सामन्यात अशी काही फटकेबाजी केली, की अवघं क्रिकेट जगत् त्याच्या प्रेमात पडलं. केवळ 36 चेंडूंत त्याने झळकावलेलं वादळी शतक हे डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्या हातांनी राजस्थानसाठी धावांचा पाऊस पाडला, त्याच वैभवला अवघ्या काही तासांतच दुसऱ्याच्या आधाराने मैदान सोडावं लागलं आणि राजस्थानच्या गोटात चिंतेचं सावट पसरलं.

झालं असं की, सनरायझर्स हैदराबादच्या डावादरम्यान तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करत असताना वैभवला गंभीर दुखापत झाली. हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन याने मारलेला एक वेगवान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात वैभवला हॅमस्ट्रिंगचा (स्नायू दुखावणं) जोरदार झटका बसला. शीर आकसल्याने वेदना इतक्या असह्य होत्या की, तो मैदानावरच कोसळून कण्हू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फिजिओथेरिपिस्टनी तातडीने धाव घेतली. मात्र, त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणंही कठीण झालं होतं. अखेर, सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं आणि शतकाच्या आनंदावर दुखापतीचं विरजण पडलं.

हेही वाचा: Gulabrao Patil Son Banner : गुलाबराव पाटलांच्या चिरंजीवांचे शहरात झळकले बॅनर! 'भावी आमदार' म्हणून लागले बॅनर

वैभवची ही दुखापत पाहिल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना आणि तज्ज्ञांना थेट चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) आयुष म्हात्रेची आठवण झाली. विशेष म्हणजे, आयुषलाही याच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. चेन्नईच्या डावात पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धाव घेताना आयुषला ही दुखापत झाली होती. असह्य वेदना होत असतानाही तो काही काळ मैदानावर टिकून राहिला, पण शरीराने साथ न दिल्याने दोन चेंडूंनंतर तो बाद झाला आणि त्यालाही आधारानेच बाहेर जावं लागलं होतं. दुखापतीचे स्वरूप इतके गंभीर होते की, आयुषला सक्तीचा आराम सांगण्यात आला आणि तो थेट आयपीएल 2026 च्या उर्वरित हंगामातून बाहेर फेकला गेला.

आता हाच इतिहास वैभव सूर्यवंशीच्या बाबतीतही पुनरावृत्त होणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव या दोघांच्याही दुखापतींमध्ये एक विचित्र साम्य आहे. दोघांनाही हैदराबादविरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगचा सामना करावा लागला. जर वैभवची दुखापतही आयुषइतकीच खोल आणि गंभीर असेल, तर त्याला आगामी सामन्यांना मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. 36 चेंडूंत शतक ठोकणारा असा 'मॅच-विनर' खेळाडू जर स्पर्धेबाहेर गेला, तर हा राजस्थान रॉयल्ससाठी हा खूप मोठा धक्का असेल.

सध्या वैभववर वैद्यकीय उपचार सुरू असून, त्याच्या दुखापतीचा सविस्तर अहवाल (स्कॅन रिपोर्ट) येणे बाकी आहे. हा अहवालच त्याचे आयपीएलमधील भवितव्य ठरवेल. एकीकडे संघ व्यवस्थापन आणि दुसरीकडे कोट्यवधी चाहते आता श्वास रोखून या अहवालाची वाट पाहत आहेत. वैभवची ही दुखापत फार गंभीर नसो आणि हा युवा खेळाडू पुन्हा एकदा मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी लवकरच परतो, अशीच प्रार्थना सध्या क्रिकेट विश्वातून केली जात आहे. 

हेही वाचा: PM Narendra Modi: अमेरिकेतील गोळीबाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ; ट्रम्प यांच्या सुरक्षिततेसाठी व्यक्त केली काळजी


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या