Wednesday, April 22, 2026 11:01:55 PM

Vande Bharat Food Quality : 'वंदे भारत'च्या जेवणात आढळला कीडा, IRCTC ची मोठी कारवाई; व्हेंडरला लाखोंचा दंड, कंत्राटही केलं रद्द

प्रवाशाच्या तक्रारीनंतर अवघ्या 12 तासांच्या आत IRCTC ने अधिकृत उत्तर देत कारवाईची माहिती दिली. संबंधित किचनला सील ठोकून तिथे स्वच्छतेचे आणि पेस्ट कंट्रोलचे काम हाती घेण्यात आले आहे.

vande bharat food quality  वंदे भारतच्या जेवणात आढळला कीडा  irctc ची मोठी कारवाई व्हेंडरला लाखोंचा दंड कंत्राटही केलं रद्द

Vande Bharat food vendor license cancelled by Railway Ministry : अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या हायटेक 'वंदे भारत एक्सप्रेस'मधील खानपान सेवेचा दर्जा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका प्रवाशाला दिलेल्या जेवणात अळी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत IRCTC ने संबंधित व्हेंडरवर कडक कारवाई केली आहे. आदित्य डिडवानिया नावाच्या प्रवाशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्यानंतर रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्हेंडरला धडा शिकवण्यासाठी रेल्वेने केवळ मोठा दंडच ठोठावला नाही, तर त्यांचे परवानाही तत्काळ रद्द केला आहे.

नेमका प्रकार काय घडला?
प्रवासी आदित्य डिडवानिया वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांना देण्यात आलेल्या वरणामध्ये अळी तरंगताना दिसली. त्यांनी या घटनेचे चित्रीकरण करून व्हेंडर कंपनीच्या ओळखपत्राचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला. आदित्य यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या डब्यात किमान 2 वेळा असाच प्रकार घडला, ज्यामुळे इतर प्रवाशांनीही जेवण बंद केले. त्यांनी FSSAI, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करून या व्हेंडरवर छापे टाकण्याची आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.

व्हेंडरवर 10 लाखांचा दंड आणि कंत्राट रद्द
प्रवाशाच्या तक्रारीनंतर अवघ्या 12 तासांच्या आत IRCTC ने अधिकृत उत्तर देत कारवाईची माहिती दिली. मेसर्स वृंदावन फूड प्रॉडक्ट्स (आरके ग्रुपचा भाग) या व्हेंडर कंपनीवर 10,00,000 रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच या कंपनीचे रेल्वेतील खानपान सेवेचे कंत्राटही रद्द करण्यात आले आहे. संबंधित किचनला सील ठोकून तिथे स्वच्छतेचे (Deep Cleaning) आणि पेस्ट कंट्रोलचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि अन्नाचा दर्जा ही आमची पहिली प्राथमिकता असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - SC On Fraudulent Accounts: फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; बँकांना मिळाले अमर्याद अधिकार; सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' मोठा निकाल

सोशल मीडियावर टीकेची झोड
या घटनेनंतर नेटकऱ्यांनी रेल्वेतील खाद्यान्नाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी उपरोधिकपणे "व्हेजचे नॉनव्हेजमध्ये फ्री अपग्रेड" अशी टीका केली, तर काहींनी स्थानिक व्हेंडरच्या स्वच्छतेच्या अभावावर बोट ठेवले. "रेल्वे प्रवासात नेहमी घरचेच अन्न सोबत ठेवावे," असा सल्लाही अनेक वापरकर्त्यांनी दिला आहे. FSSAI च्या मानकांचे पालन रेल्वेच्या किचनमध्ये होत नसल्याचा संशयही अनेक प्रवाशांनी व्यक्त केला असून, अशा व्हेंडरवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाचा इशारा
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या व्हेंडरच्या किचनमधील अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापूर्वीही अशाच एका घटनेत रेल्वेने कठोर भूमिका घेत IRCTC आणि व्हेंडर दोघांवर कारवाई केली होती. आता 10 लाखांच्या या दंडाने इतर व्हेंडर्सनाही एक कडक इशारा दिला आहे. इथून पुढे रेल्वेमध्ये अन्न पुरवठा करण्यापूर्वी प्रत्येक व्हेंडरला गुणवत्तेची कडक चाचणी करावी लागणार आहे, अन्यथा अशाच प्रकारच्या टोकाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

हेही वाचा - Anti Terrorism Squad ची मोठी कारवाई; पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या जाळ्याचा पर्दाफाश; पाच संशयित ताब्यात


सम्बन्धित सामग्री