पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यावरून राज्यातील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार असून, तृणमूल काँग्रेस त्यांचा दक्षिण बंगालमधील गड कायम राखते की भारतीय जनता पक्ष त्यात लढा देण्यात यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या टप्प्यात एकूण 142 विधानसभा जागांसाठी मतदान होत असून, कोलकाता, हावडा, उत्तर व दक्षिण 24 परगणा, नदिया, हुगळी आणि पूर्व बर्धमान या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. 2021 च्या निवडणुकीत या 142 जागांपैकी तब्बल 123 जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या, तर भाजपला 18 आणि इंडियन सेक्युलर फ्रंटला एक जागा मिळाली होती.
या निवडणुकीत भवानीपुर ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. ही जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानली जाते. 2021 मध्ये नंदीग्राम येथे झालेल्या पराभवानंतर भवानीपुर ही त्यांच्यासाठी सन्मानाची लढत ठरली आहे. भाजपसाठी या जागेवर विजय मिळवणे म्हणजे राज्यातील सर्वात प्रभावशाली नेत्या ममता बॅनर्जी यांच्या ‘विजयी’ प्रतिमेला धक्का देणे ठरेल.
या टप्प्यात सुमारे 3 कोटी 21 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 64 लाखांहून अधिक पुरुष, 1 कोटी 57 लाखांहून अधिक महिला आणि 792 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 41,001 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, सर्व ठिकाणी वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा: West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात डावे-काँग्रेस कुणाचा गेम करणार?; भाजप-टीएमसीचं टेन्शन वाढलं
सुरक्षेच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मोठी तयारी केली आहे. सात जिल्ह्यांमध्ये सेंट्रल फोर्सच्या 2,321 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय 142 सामान्य निरीक्षक, 95 पोलीस निरीक्षक आणि 100 खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर केला जात आहे.
या टप्प्यातील काही जागांवर विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे. भांगड येथे सर्वाधिक 19 उमेदवार रिंगणात असून, गोघाट येथे सर्वात कमी पाच उमेदवार आहेत. तसेच कोलकाता पोर्ट येथे तृणमूलचे वरिष्ठ नेते फिरहाद हकीम यांचा सामना भाजपचे राकेश सिंह यांच्याशी होत आहे. याशिवाय भाटपारा, जगतदल, बैरकपूर, बनगाव, दमदम, संदेशखली, राणाघाट, जादवपूर आणि बालीगंज या जागाही महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमुख मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. कृष्णानगर उत्तर येथे भाजपचे तारक नाथ चटर्जी यांचा सामना तृणमूल काँग्रेसचे अविनाभ भट्टाचार्य यांच्याशी होत आहे. नैहाटी मतदारसंघात भाजपचे सौमित्र चटर्जी आणि तृणमूलचे सनत डे यांच्यात लढत रंगली आहे. त्याचप्रमाणे भाटपारा येथे भाजपचे पवन कुमार सिंह आणि तृणमूलचे अमित गुप्ता आमनेसामने आहेत. जगतदल मतदारसंघात भाजपचे डॉ. राजेश कुमार (IPS) आणि तृणमूल काँग्रेसचे सोमनाथ श्याम इचिनी यांच्यात चुरस दिसत आहे. बैरकपूर येथे भाजपचे कौस्तव बागची आणि तृणमूलचे राजू चक्रवर्ती यांच्यात सामना होत आहे. तसेच दमदम उत्तर मतदारसंघात भाजपच्या अर्चना मजूमदार यांचा मुकाबला तृणमूल काँग्रेसच्या चंद्रिमा भट्टाचार्य यांच्याशी होत असून, या सर्व लढतींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
एकूणच, या अंतिम टप्प्यातील मतदानामुळे पश्चिम बंगालमधील सत्तेचे भवितव्य निश्चित होणार असून, दोन्ही प्रमुख पक्षांसाठी ही निर्णायक लढत ठरत आहे.
हेही वाचा: Vidhan Parishad Election 2026: भाजपाचा ‘सबका साथ’चा नारा, पण ‘या’ नेत्यांनाच न्याय; विधान परिषदेचे तिकीट मिळालेले 6 शिलेदार कोण?