Monday, May 11, 2026 11:11:28 AM

West Bengal Election 2026: बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? सुरुवातीच्या कलानं वाढवलं ममतादीदींचं टेंशन, भाजपची बहुमताकडे वेगाने घोडदौड

ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जात असून राज्यात सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे.

west bengal election 2026 बंगालमध्ये कमळ फुलणार सुरुवातीच्या कलानं वाढवलं ममतादीदींचं टेंशन भाजपची बहुमताकडे वेगाने घोडदौड

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, सुरुवातीच्या कलानुसार राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) मोठा हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, भारतीय जनता पक्षाने (BJP) बहुमताचा आकडा ओलांडल्याचे चित्र दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने 149 जागांवर आघाडी मिळवत आपली पकड घट्ट केली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस अवघ्या 92 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. या कलानंतर बंगालमध्ये 'सत्तांतरा'ची चर्चा सुरू झाली असून 'दीदी' विरुद्ध 'दादा' या लढतीत भाजपचे पारडे जड होताना दिसत आहे.

सध्या मतमोजणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून भाजपने बहुमताच्या 148 या आकड्याच्या जवळ मजल मारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपने 135 जागांवर आघाडी घेतली होती, जी नंतर 142 वर पोहोचली, तर तृणमूल काँग्रेसचे आकडे 99 ते 107 च्या दरम्यान हेलकावे खाताना दिसत आहेत. विशेषतः भवानीपूर आणि नंदीग्राम यांसारख्या हाय-व्होल्टेज जागांवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बंगालमध्ये यंदा 'काटे की टक्कर' पाहायला मिळत असून, काही वेळापूर्वी दोन्ही प्रमुख पक्ष 118-118 अशा समान जागांवर झुंज देत होते, मात्र आता भाजपने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

भाजपचे दिग्गज नेते आणि एकेकाळी ममतांचे विश्वासू सहकारी राहिलेले शुभेंदु अधिकारी यांनी यावेळी मोठा विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. "आम्ही भवानीपूरमधून निवडणूक जिंकू, दहाव्या राऊंडनंतर आमची आघाडी अधिक स्पष्ट होईल," असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, यावेळी हिंदू मतदारांनी एकतर्फी मतदान केले असून नंदीग्रामप्रमाणेच भवानीपूरमध्येही भाजपची सरशी होईल. मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपला होत असून प्रस्थापितविरोधी (Anti-Incumbency) लाटेमुळे तृणमूल काँग्रेसच्या सत्तेचा पाया हादरला आहे, असे संकेत शुभेंदु अधिकारी यांनी दिले आहेत.

हेही वाचा: Weather Update Western Disturbance : महाराष्ट्राच्या दिशेने वळतंय ते संकट! 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे होणार मोठे बदल

दुसरीकडे, भाजपचे राज्यसभा खासदार राहुल सिन्हा यांनीदेखील राज्यात 'कमळ' फुलणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. "हा भाजप कार्यकर्त्यांच्या अढळ धैर्याचा आणि समर्पणाचा विजय आहे, आम्ही बंगालमध्ये सरकार स्थापन करणार आहोत," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय पक्षाची केंद्रीय नेतृत्व पातळी घेईल, मात्र ममता बॅनर्जी या स्वतःची भवानीपूरची जागा हरतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. तृणमूल सरकारने केवळ जनतेवर अत्याचार केले आणि आता जनता त्यांना धडा शिकवत असल्याची टीका सिन्हा यांनी केली आहे.

बंगालच्या या रणधुमाळीत इतर पक्षांच्या खात्यात केवळ 3 जागा जाताना दिसत असून, संपूर्ण लढा भाजप आणि तृणमूल यांच्यातच केंद्रित झाला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या मतमोजणीमध्ये कधी भाजप, तर कधी तृणमूल आघाडीवर असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, दुपारपर्यंतच्या कलानुसार भाजपने 149 जागांचा आकडा गाठल्याने बंगालमध्ये भगवी लाट येणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदारांचा हा अंतिम कौल बंगालच्या भविष्याची कोणती नवी दिशा ठरवतो, हे काही तासांतच स्पष्ट होईल. 

हेही वाचा: Baramati Rahuri Bypolls Election Results: अजितदादा गेले पण जादू कायम, बारामतीकरांचा सुनेत्रा वहिनींना 'फुल्ल सपोर्ट', चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 36 हजार 591 मतांनी आघाडीवर


सम्बन्धित सामग्री