Mehul Choksi PNB Fraud: आज पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय बँकिंग क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा होता, ज्याची चौकशी सीबीआय आणि ईडीसह अनेक एजन्सी करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात, पीडितांना मालमत्ता परत मिळावी यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले होते. मेहुल चोक्सी प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी ईडीने पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेसह मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला होता.
लिक्विडेटरकडे सोपवण्यात आली 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता -
ED ने केलेला हा अर्ज स्वीकारत न्यायालयाने 2565.90 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यास परवानगी दिली होती. या आदेशानंतर, मालमत्ता त्यांच्या हक्काच्या मालकांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत आतापर्यंत, मेहुल चोक्सीच्या कंपनी गीतांजली जेम्सची 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता लिक्विडेटरकडे सुपूर्द करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईतील फ्लॅट आणि SEEPZ परिसरात असलेले दोन कारखाने आणि गोदामे समाविष्ट आहेत.
चोक्सीने आयसीआयसीआय बँकेकडून घेतले होते कर्ज -
मेहुल चोक्सीने 2014 ते 2017 दरम्यान पीएनबी अधिकाऱ्यांसोबत मिळून फसवणूक केली होती. चोक्सीने फसवणूक करून लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज आणि फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट जारी केले होते, ज्यामुळे बँकेचे 6097.63 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर चोक्सीने आयसीआयसीआय बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. त्याने ICICI बँकेकडून घेतलेले कर्ज देखील परत केले नाही.
हेही वाचा - PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
देशभरातील 136 ठिकाणी ED कडून छापे -
दरम्यान, ईडीने या प्रकरणात देशभरातील 136 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत आणि 597.75 कोटी रुपयांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. याशिवाय, 1968.15 कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये भारत आणि परदेशातील मालमत्ता, वाहने, बँक खाती, कारखाने, शेअर्स आणि दागिने यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Tahawwur Rana NIA Custody: तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी
मेहूल चोक्सीच्या कोणत्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या?
प्राप्त माहितीनुसार, मेहूल चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेडच्या सहा मालमत्ता - मुंबईतील खेनी टॉवरमधील फ्लॅट (सुमारे 27 कोटी रुपये किमतीचे) आणि सीप्झमधील इतर दोन मालमत्ता (एकूण 98.03 कोटी रुपये किमतीच्या) लिक्विडेटरकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.