ATF Ethanol Blending : विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘एव्हिएशन टर्बाइन फ्युएल’ (ATF) मध्ये सरकार इथेनॉल मिसळणार असल्याच्या चर्चांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी पूर्णविराम दिला आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसून या बातम्या निव्वळ अफवा आणि बेजबाबदारपणाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोलच्या धर्तीवर विमानाच्या इंधनातही इथेनॉलचा वापर केला जाईल, या दाव्यात तथ्य नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही मंत्रालयाने दिली आहे.
‘इथेनॉल’ आणि ‘SAF’ मधील फरक स्पष्ट
मंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले की, नागरिक प्रायः ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ (SAF) आणि ‘इथेनॉल’ या दोन वेगळ्या संकल्पनांमध्ये गल्लत करत आहेत. SAF हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आणि ‘इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन’ (ICAO) द्वारे प्रमाणित सुरक्षित विमान इंधन आहे. कडक चाचण्यांनंतरच या इंधनाचा वापर केला जातो. त्यामुळे साध्या इथेनॉलचा विमानात वापर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
The claim that the Government plans to blend ethanol with Aviation Turbine Fuel (ATF) is completely false and irresponsible. There is no such proposal. Ethanol and Sustainable Aviation Fuel (SAF) are entirely different and should not be conflated. SAF is an internationally… — Ram Mohan Naidu Kinjarapu (@RamMNK) August 6, 2026
हेही वाचा – Pune Traffic Rank: जागतिक ट्रॅफिक यादीत पुण्याचा पाचवा क्रमांक; वर्षातील ‘इतके’ तास रस्त्यावरच जाताय वाया
राजकीय आरोप आणि इंधन धोरणाची वस्तुस्थिती
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काहींनी केंद्र सरकारवर यासंदर्भात आरोप केले होते. ATF मध्ये इथेनॉल मिसळल्यास विमानांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सरकारने स्पष्ट केले की, सध्या देशात केवळ पेट्रोलमध्येच 20 टक्के इथेनॉलच्या वितरणाला परवानगी आहे. पेट्रोल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही इंधनात अथवा विमान इंधनात इथेनॉल मिसळण्याचा कोणताही विचार नाही.