RBI Repo Rate Cut Possibility: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 22 सप्टेंबरपासून लागू झालेल्या नवीन GST दर सुधारणा मुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, कार, बाईक, विमा आणि आरोग्य सेवांच्या किमतींमध्ये घट झाली आहे. या कपातीचा थेट परिणाम महागाईवर झाला असून अन्नपदार्थ आणि पेयांच्या दरांतील घसरणीमुळे चलनवाढीचा वेग कमी झाला आहे.
महागाईत झालेल्या या घटीनंतर आता गृहकर्ज आणि वाहनकर्जाच्या EMI मध्ये कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिसेंबर महिन्यातील पतधोरण बैठकीत रेपो दरात 0.25 टक्के म्हणजेच 25 बेस पॉइंट्सने कपात करू शकते, अशी बाजारात चर्चा आहे. सध्या रेपो दर 5.50 टक्के आहे आणि कपात झाल्यास तो 5.25 टक्क्यांवर येऊ शकतो.
हेही वाचा -Jan Dhan Yojana: सरकारी बँकांमध्ये 26 टक्के जनधन खाती निष्क्रिय! काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
वैयक्तिक कर्जाचा EMI कमी होणार?
या निर्णयामुळे बँकांच्या कर्जावरील व्याजदरात घट होईल आणि त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे ईएमआय कमी होऊ शकतात. आर्थिक क्रियाकलापांना चालना देणे आणि गुंतवणूक वाढवणे हा रिझर्व्ह बँकेचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सावध भूमिका घेतली आहे.
हेही वाचा - Gold Silver Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या! जाणून घ्या आजचे ताजे दर
संजय मल्होत्रा यांनी चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) इतिवृत्तात लिहिले आहे की, सध्या व्याजदर कपात करण्याची वेळ पूर्णपणे योग्य नाही. कारण चलनवाढ सौम्य असली तरी जागतिक पातळीवरील व्यापारातील अनिश्चितता आणि आधीच्या आर्थिक उपाययोजनांचा परिणाम अजून दिसून येत आहे. अमेरिकेतील शुल्क धोरण, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि भारतातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन MPC ने एकमताने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, जर महागाईचा वेग पुढील दोन महिन्यांत आणखी कमी झाला, तर डिसेंबरमध्ये RBI कडून दरकपातीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे लाखो कर्जदारांचे लक्ष आता डिसेंबरच्या बैठकीकडे लागले आहे. कारण रेपो दरात कपात झाली, तर नववर्षाच्या आधी EMI कमी होण्याची शक्यता प्रबळ आहे.