मुंबई: गेल्या काही दिवसांपासून टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची आई माये मस्क सध्या मुंबईत आहेत. इतकंच नाही, तर यावर्षी एलॉन मस्कची आई माये मस्क यांनी मुंबईमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पाठवलेल्या फुलांसोबत त्यांची आई माये मस्क यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला होता.
सोमवारी, एलॉन मस्क यांची आई माये मस्क यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यादरम्यान, एलॉन मस्क यांच्या आईसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील उपस्थित होती. 'ए वुमन मेक्स अ प्लान' हे पुस्तक माये मस्क यांनी लिहिले असून त्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी माये मस्क मुंबईत दाखल झाले होते. यानंतर त्यांनी ‘राजकमल बुक्स’ला टॅग करून पुस्तकांसोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा: मुंबईकरांसाठी खुशखबर; सोमवारपासून आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल
या फोटोमध्ये त्यांनी पुस्तकाची हिंदी आवृत्ती भाषांतरित करून प्रकाशित केल्याबद्दल राजकमल बुक्सचे आभार मानले आहेत. 20 एप्रिल रोजी माये मस्क यांच्या वाढदिवसानिमित्त एलॉन मस्क यांनी फुलं पाठवली होती. या फुलांसोबत माये मस्क यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हणाल्या, 'माझ्या वाढदिवसानिमित्त मला मुंबईमध्ये ही फुलं पाठवल्याबद्दल एलॉन, तुझे आभार,' असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं. यावर अभिनेत्री जॅकलिन म्हणाल्या की, 'माय डिअर फ्रेंड माये.'
या दरम्यान, अभिनेत्री जॅकलिनने सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनानंतर दिलेल्या एका प्रतिक्रियेमध्ये 'माय डिअर फ्रेंड माये' असा उल्लेख करत एलॉन मस्क यांच्या आईचं कौतुक केलं आहे. 'सिद्धिविनायक मंदिरात माझी प्रिय मैत्रिण माये सोबत दर्शन घेणं हा एक खूप सुंदर अनुभव होता. माये त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भारतात आल्या आहेत. माये यांच्या पुस्तकातून एका महिलेचा लढा दिसून येतो. विशेषत: वय हा फक्त एक आकडा असून त्यावरून तुमच्या स्वप्नांचा किंवा ध्येयाचा अंदाज येऊ शकत नाही,' अशी प्रतिक्रिया जॅकलिननं दिली आहे.