Company Sponsored London Trip: रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने पुढे सरसावलेल्या कासाग्रँड कंपनीने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भव्य सरप्राईजची घोषणा केली आहे. कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण एम. एन. यांनी संस्थेच्या वाढीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या तब्बल 1000 कर्मचाऱ्यांना संपूर्ण खर्च कंपनीकडून करून लंडन सफरीची भेट दिली आहे. ही सहल कंपनीच्या ‘प्रॉफिट शेअर बोनान्झा’ उपक्रमाचा एक भाग आहे. यामागे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला सन्मान देणे, हा उद्देश आहे.
कर्मचाऱ्यांसाठी अविस्मरणीय भेट
या उपक्रमांतर्गत सहभागी कर्मचाऱ्यांना लंडनमधील प्रसिद्ध ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. विंडसर कॅसल, बकिंगहम पॅलेस, बिग बेन, सेंट पॉल कॅथेड्रल, लंडन ब्रिज, कॅम्डेन मार्केट, पिकॅडिली सर्कस अशी अनेक ठिकाणे ते पाहणार आहेत. कासाग्रँडच्या मते, 'कर्मचारी हे कंपनीचे बळ आहेत. त्यांच्या कष्टांमुळेच संस्थेची वाटचाल वेगाने होते. म्हणूनच नफ्यातील एक हिस्सा त्यांना परत देण्याची संस्कृती कंपनी कायम राखत आहे.
कंपनीची परंपरा-कर्मचाऱ्यांना परदेश सफारीची भेट
कासाग्रँडकडून कर्मचाऱ्यांना परदेश दौरे देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही कंपनीने सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई आणि स्पेन यांसारख्या देशांत 6000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सहलीसाठी पाठवले आहे. यावर्षी लंडनची निवड करण्यात आली आहे. 2004 मध्ये स्थापन झालेल्या कासाग्रँडने चेन्नई, कोयंबतूर आणि बंगळुरु येथे शेकडो प्रकल्प उभे केले आहेत. कंपनीची वाढ ही टीमवर्कचे थेट फलित असल्याचे अरुण नेहमीच सांगतात.
हेही वाचा – Viral Video : नजर जाईल तिथे चमकणाऱ्या सौर पॅनेलच्या पर्वतरांगा! चीनमधील हा'' ड्रोन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
अरुण एम. एन कोण आहेत?
दरम्यान, अरुण एम. एन. यांनी चेन्नईत करिअरची सुरुवात करताना त्यांनी विप्रो इन्फोटेकच्या मार्केटिंग विभागात काम केले. काही वर्षांनी त्यांनी स्वतःची रिअल इस्टेट कंपनी सुरु केली आणि अल्पावधीतच कासाग्रँडला दक्षिण भारतातील अग्रगण्य ब्रँडमध्ये रूपांतरित केले. कंपनीसाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जग पाहायलं हवं, आनंद अनुभवायला हवा, असा त्यांचा विश्वास असून, हीच भावना 1000 कर्मचाऱ्यांच्या लंडन सहलीतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.