उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, शहराच्या महापौर हेमलता दिवाकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या व्हिडिओमध्ये त्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत, मात्र यावेळी त्यांनी काही तथ्यात्मक चुका केल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
हा प्रकार त्या वेळी घडला, जेव्हा उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री बेबी राणी मौर्य अनुपस्थित असताना हेमलता दिवाकर माध्यमांशी संवाद साधत होत्या. भाजपच्या ब्रज प्रांत कार्यालयात “नारी शक्ती वंदन अधिनियम” या विषयावर आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सुमारे 47 सेकंदांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, महापौर आधी त्यांच्या सहकाऱ्यांना हसत विचारतात की आशा भोसले या गायिका होत्या का. सहकाऱ्यांकडून खात्री मिळाल्यानंतर त्या म्हणतात की त्यांना नीट आठवत नव्हते. त्यानंतर श्रद्धांजली व्यक्त करताना त्यांनी नावाचाही चुकीचा उच्चार करत “आशा घोसले” असे म्हटले.
त्या म्हणाल्या, “श्रीमती आशा घोसले आज आपल्यात नाहीत, संगीत क्षेत्रासाठी ही मोठी हानी आहे.” यानंतर त्यांनी आग्रावासीयांच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, या विधानादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले हसू आणि माहितीतील चुका यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी महापौरांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहींनी यावर उपरोधिक टीका केली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी संवेदनशील विषयांवर बोलताना अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.