AI Browser: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने जगात क्रांती घडवली आहे. रोज नवनवीन AI टूल्स आणि ब्राउजर्स बाजारात येत आहेत, जे वापरकर्त्याचं काम सोपं करतात. पण या सोयींच्या आड लपलेला धोका आता समोर येत आहे. सायबर सिक्युरिटी तज्ञांच्या म्हणण्यानुसार, AI ब्राउजरचा वापर करताना तुमचं बँक अकाउंट आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.
गेल्या काही महिन्यांत OpenAI आणि Perplexity सारख्या कंपन्यांनी AI-आधारित ब्राउजर्स लॉन्च केले आहेत. हे ब्राउजर्स पारंपारिक Google Chrome किंवा Mozilla Firefox पेक्षा जास्त स्मार्ट आहेत. यात अनेक आकर्षक फिचर्स, व्हॉइस कमांड आणि रिअल-टाइम सहाय्य मिळतं. पण तज्ञांच्या मते, हीच सोय सायबर क्रिमिनल्ससाठी सोन्याची संधी ठरू शकते.
सिक्युरिटी रिसर्चरची चेतावणी
सायबर सिक्युरिटी तज्ञांनी Perplexity Comet आणि इतर काही AI ब्राउजर्समध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. त्यांना 'Indirect Prompt Injection' असं नाव दिलं गेलं आहे. हा असा हल्ला आहे ज्यात सिस्टीममध्ये चुकीचा आदेश लपवून टाकला जातो. AI त्या आदेशाला योग्य समजून वापरकर्त्याची माहिती बाहेर पाठवतो. या प्रक्रियेत बँक खात्याशी संबंधित डेटा, ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक दस्तऐवज चुकीच्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतात.
हेही वाचा: Meta Layoffs: मेटाने AI युनिटमधून 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; FAIR, TDB लॅब आणि इन्फ्रास्ट्रक्चर युनिट प्रभावित
जर या ब्राउजरला तुमच्या ईमेल, बँकिंग अॅप्स किंवा क्लाऊड डॉक्युमेंट्सची ऍक्सेस असेल, तर नुकसान आणखी वाढू शकतं. अशा स्थितीत हॅकर्स तुमचं संपूर्ण अकाउंट रिकामं करू शकतात, आणि तुम्हाला त्याची जाणीवही होणार नाही.
कसा होतो हा अटॅक?
रिपोर्टनुसार, इनडायरेक्ट प्रॉम्प्ट इंजेक्शनमध्ये एक हिडन कमांड AI सिस्टममध्ये घुसवली जाते. दिसायला ती निरुपद्रवी वाटते, पण तिच्यामार्फत AI वापरकर्त्याची संवेदनशील माहिती उघड करतो. हे हल्ले ओळखणं अवघड असल्यामुळे ते अधिक धोकादायक ठरतात.
गूगल क्रोम आणि मोजिला फायरफॉक्स सारख्या ब्राउजर्समध्ये सुद्धा पूर्वी सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या, पण त्या कंपन्या वेळोवेळी सिक्युरिटी अपडेट्स देतात. AI ब्राउजर्स अजून नवीन असल्याने त्यात सुरक्षा उपाय इतके मजबूत नाहीत.
हेही वाचा: Ayushman Card Helpline Number: लांब रांगेत उभे राहण्याची झंझट संपली! आता एका कॉलवर बुक करता येणार अपॉइंटमेंट
एक्सपर्ट्सचा सल्ला
तज्ञांच्या मते, सध्या AI ब्राउजर्स पूर्णतः सुरक्षित नाहीत. वापरकर्त्यांनी त्यांचा वापर करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
-
आर्थिक व्यवहार किंवा बँकिंग साइट्सवर AI ब्राउजर वापरू नका.
-
ब्राउजरला अनावश्यक परवानग्या देऊ नका.
-
नेहमी अधिकृत साइटवरूनच डाउनलोड करा.
-
पासवर्ड आणि ओटीपी शेअर करू नका.
AI ब्राउजर्स भविष्यात नक्कीच डिजिटल जगाचं स्वरूप बदलतील, पण सध्या तरी त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी वापरताना “सावधानता” हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.