Sunday, May 10, 2026 08:11:11 PM

Viral Video: अरे बापरे, हे काय केलं! लाईव्ह शोमध्ये गायक इतका चिडला की थेट प्रेक्षकांवर थुंकला; घाणेरड्या कृत्यामागचं कारणही तितकंच संतापजनक

हैदराबादमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान गायक अर्पित बाला याने प्रेक्षकाच्या वर्तनामुळे संताप व्यक्त करत वादग्रस्त कृती केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे

viral video अरे बापरे हे काय केलं लाईव्ह शोमध्ये गायक इतका चिडला की थेट प्रेक्षकांवर थुंकला घाणेरड्या कृत्यामागचं कारणही तितकंच संतापजनक

Arpit Bala controversy: हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडलेल्या घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. स्वतंत्र संगीतविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा गायक अर्पित बाला सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत असतानाच काहीजण त्याच्या बाजूनेही उभे राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील एका क्लबमध्ये अर्पित बाला लाइव्ह परफॉर्मन्स देत होता. कार्यक्रम रंगात आला असताना प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने अचानक स्टेजच्या दिशेने बाटली फेकली. हा प्रकार पाहून काही क्षण गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर अर्पित संतापल्याचे दिसून आले.

परफॉर्मन्स थांबवून अर्पितने थेट प्रेक्षकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. “बाटली कोणी फेकली?” असा संतप्त सवाल करत तो त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागला. काही वेळानंतर संबंधित व्यक्ती ओळखल्यानंतर मात्र परिस्थिती अधिकच बिघडली. रागाच्या भरात अर्पितने त्या व्यक्तीवर थेट थुंकल्याचा आरोप होत आहे. इतकंच नव्हे, तर त्याने पुन्हा बाटली फेकल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला बाहेर काढले. काही प्रेक्षकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी अर्पितच्या प्रतिक्रियेला समर्थन दिले. “प्रेक्षकाने आधी चुकीचे वर्तन केले, त्यामुळे कलाकाराची प्रतिक्रिया स्वाभाविक होती,” असे मत काही चाहत्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. अनेकांनी अर्पितच्या वागण्यावर तीव्र टीका करत त्याला संयम बाळगण्याचा सल्ला दिला. तर काहींनी कलाकारांवर होणाऱ्या अशा गैरवर्तनाचा निषेध केला आहे.

अर्पित बाला हा भारतीय स्वतंत्र संगीत क्षेत्रातील ओळख निर्माण करणारा कलाकार आहे. रॅप आणि कॉमेडी यांचा अनोखा संगम साधत त्याने सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. त्याच्या काही गाण्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली असून तो तरुणांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

या घटनेमुळे एक प्रश्न पुन्हा समोर आला आहे; कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील सीमारेषा कुठे आखली जावी? प्रेक्षकांनी कार्यक्रमादरम्यान शिस्त पाळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच कलाकारांनीही कठीण प्रसंगी संयम राखणे गरजेचे आहे. सध्या या वादामुळे अर्पित बाला चर्चेत असून पुढील काळात यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री