शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्जमाफीचे पैसे कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला आहे. यावेळी तब्बल 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 5029 कोटी रुपये ट्रान्स्फर सरकारकडून करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतर केली. दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली. यावेळी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर रक्कम थेट जमा करण्यात आली. तर पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांच्या खात्यात अद्याप कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झालेला नाही.
त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही कर्जमाफीच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ मिळेल.