SBI FD Interest Rates: जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये मुदत ठेव (एफडी) करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच एफडीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, हे नवीन व्याजदर 15 डिसेंबर 2025 पासून लागू होतील. याचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांसह ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नावर होणार आहे.
2 ते 3 वर्षांच्या एफडीवर व्याजदरात घट
एसबीआयने 2 वर्षांपेक्षा कमी आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत. या बदलानंतर सामान्य ग्राहकांना या कालावधीतील एफडीवर आता 6.45 टक्क्यांऐवजी 6.40 टक्के व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 6.95 टक्क्यांवरून 6.90 टक्के करण्यात आला आहे.
‘अमृत वर्षा’ विशेष योजनेवरही परिणाम
एसबीआयच्या लोकप्रिय 444 दिवसांच्या ‘अमृत वर्षा’ विशेष एफडी योजनेवरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. या योजनेत सामान्य ग्राहकांना आता 6.60 टक्क्यांऐवजी 6.45 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.10 टक्क्यांवरून 6.95 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.20 टक्क्यांवरून 7.05 टक्के इतका कमी करण्यात आला आहे.
हेही वाचा – Retail Inflation : सामान्यांना मोठा धक्का! नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईने गाठला उच्चांक, जाणून घ्या
अति ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त लाभ
एसबीआयच्या नियमानुसार, अति ज्येष्ठ नागरिकांना (80 वर्षे किंवा त्याहून अधिक वय) ज्येष्ठ नागरिकांच्या व्याजदरापेक्षा 10 बेसिस पॉइंट्स अधिक व्याज दिले जाते. मात्र, हा अतिरिक्त लाभ आवर्ती ठेवी, कर-बचत एफडी, एमओडीएस तसेच नॉन-कॉल करण्यायोग्य मुदत ठेवी यांसारख्या काही योजनांवर लागू होणार नाही. या निर्णयामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडीवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना नव्या व्याजदरांचा विचार करून पुढील आर्थिक नियोजन करावे लागणार आहे.