आज माध्यमांसमोर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी यांच्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी राज्यातील बळीराजासाठी आधीच मोठ्या संकटात सपडलेला असताना आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे.
राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडून या संदर्भातील तांत्रिक मंजुरी मिळवली असून, विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय होईल. निवडणूक आयोगाने अट टाकली आहे की, विषय मंजूर करा व पुढील कार्यवाही करा. त्यामुळे कर्जमाफीची अधिकृत घोषणा बाकी आहे. आज निर्णय घेऊ, कार्यवाही करू पण नंतर घोषणा करू.. राज्यात महायुतीचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीदेण्याची घोषणा राज्यकर्त्यांनी निवडणूक काळात केली होती. त्यानुसार, शेतकऱ्यांना जून महिन्यात कर्जमाफी दिली जाईल..”
त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि आचारसंहितेच्या नियमांमुळे सरकारला थेट घोषणा करता आली नसली, तरी या योजनेचे काम थांबलेले नाही. राज्यातील महायुती सरकारकडून बळीराजासाठी विधान परिषद निवडणुकीनंतर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे.