Crocodile Tears : एखादी व्यक्ती खोटे रडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा 'मगरीचे अश्रू' (Crocodile Tears) ढाळतो, असे म्हटले जाते. ही म्हण खूप प्रचलित आहे, पण यामागचे शास्त्रीय कारण काय आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, मगर खऱ्या भावनांमुळे नव्हे, तर एका विशिष्ट शारीरिक प्रक्रियेमुळे रडते.
मगरीच्या अश्रूंचे शास्त्रीय कारण
शारीरिक प्रक्रिया: एका संशोधनादरम्यान, मगरींना पाण्याबाहेर कोरड्या जागेत अन्न दिले गेले. त्यावेळी त्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. तेव्हा असे दिसून आले की, मगर अन्न खात असताना तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते. 'बायो सायन्स' (BioScience) मासिकाच्या दाव्यानुसार, हे अश्रू कोणत्याही भावनांशी संबंधित नसतात. त्यामुळेच 'मगरीचे अश्रू' ही म्हण जगभरात प्रचलित आहे, कारण मगर अनेकदा शिकार करताना किंवा खाताना रडताना दिसते.
अश्रू ग्रंथींवर ताण: जेव्हा मगर आपले भक्ष्य खाण्यासाठी जबडा उघडते, तेव्हा तिच्या अश्रू ग्रंथी (Tear Glands) आणि सायनस (Sinus) वर दाब पडतो. हा दाब डोळ्यांमधून अश्रू बाहेर ढकलतो. यामुळे असे दिसते की मगर रडत आहे, पण प्रत्यक्षात ही एक नैसर्गिक आणि अनैच्छिक शारीरिक प्रक्रिया आहे.
संसर्गापासून बचाव: अनेक शास्त्रज्ञ असेही मानतात की, मगरीच्या अश्रूंमध्ये एक विशेष प्रकारचे प्रोटीन असते. हे प्रोटीन डोळ्यांना स्वच्छ ठेवते आणि संसर्गापासून (Infection) बचाव करते.
मगर आणि सुसरीमध्ये फरक
मगर आणि सुसरी (Alligator) दोन्ही सरपटणारे प्राणी आहेत आणि ते दोघेही भक्ष्य खाताना अश्रू गाळतात. दिसायला सारखे असले तरी, त्यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. मगरीचा जबडा इंग्रजी 'V' आकाराचा असतो, तर सुसरीचा जबडा 'U' आकाराचा असतो. तसेच, मगर खाऱ्या पाण्यात राहते, तर सुसरी गोड्या पाण्यात आढळते.
हेही वाचा – Meta Smart Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केला AI स्मार्ट चष्मा; आता फोनशिवाय पाहता येतील मेसेज आणि कॉल
(Disclaimer : ही बातमी संशोधनाशी संबंधित सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही.)