What's App Fraud : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'ट्रॅफिक चलान'च्या बनावट मेसेजमुळे एकाला तब्बल 4 लाख रुपयांचा फटका बसला आहे. या सायबर ठगांनी 'NextGen mParivahan' या अधिकृत वाटणाऱ्या नावाचा वापर करून तरुणाला 1,000 रुपयांचे चलान थकीत असल्याची भीती घातली आणि त्याद्वारे एका तरुणाच्या खात्यातील लाखो रुपये लंपास केले. या घटनेमुळे डिजिटल सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवी दिल्लीतील एका तरुणासोबत हा प्रकार घडला आणि त्याने कमवलेले सर्व पैसे क्षणात गायब झाले.
एका क्लिक.. आणि खातं रिकामं
हरित नावाच्या एका तरुणाला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲप मेसेज आला, ज्यामध्ये परिवहन मंत्रालयाचा लोगो आणि अधिकृत भाषेचा वापर करण्यात आला होता. मेसेजमधील लिंकवर क्लिक करून त्याने एक ॲप्लिकेशन डाऊनलोड केले; मात्र, त्यात चलानची कोणतीही माहिती मिळाली नाही. काही वेळातच त्याला ई-मेल आला की त्याच्या ॲमेझॉन ई-वॉलेटचा पासवर्ड बदलला आहे. इतकेच नाही, तर सायबर चोरट्यांनी त्याच्या वैयक्तिक जीमेल पत्त्याऐवजी स्वतःचा पत्ता लिंक करून संपूर्ण नियंत्रण मिळवले. अवघ्या काही मिनिटांत त्याच्या क्रेडिट कार्डवरून पाच मोठ्या व्यवहारांद्वारे एकूण 4,05,000 रुपये चोरण्यात आले, ज्याचा वापर करून ठगांनी ई-गिफ्ट कार्ड्स खरेदी केले.
भीती आणि घाईचा फायदा घेणारे 'डिजिटल' चोर
सायबर गुन्हेगार लोकांच्या कायदेशीर कारवाईची भीती घालून त्याचा फायदा घेतात. पूर्व दिल्लीतही एका ज्येष्ठ नागरिकाला 500 रुपयांचे दंड भरण्याच्या बहाण्याने 2.5 लाख रुपयांना लुटण्यात आले आहे. हे ठग केवळ व्हॉट्सॲपच नाही, तर PDF आणि बनावट SMS द्वारे देखील संपर्क साधतात. अधिकृत वाटण्यासाठी ते वाहनाचा अर्धवट क्रमांक किंवा जुन्या चालानचा संदर्भ देतात. एकदा का तुम्ही त्यांच्या लिंकवर क्लिक केले किंवा APK फाईल डाऊनलोड केली की, तुमच्या फोनचा ताबा (Remote Access) त्यांच्याकडे जातो, ज्यामुळे तुमचे सर्व पासवर्ड आणि बँकिंग डिटेल्स धोक्यात येतात.
फसवणूक टाळण्यासाठी 'हे' नक्की करा
अधिकृत सरकारी यंत्रणा कधीही व्हॉट्सॲप किंवा अनोळखी नंबरवरून APK फाईल पाठवून दंड भरण्यास सांगत नाहीत. तुमचे ट्रॅफिक चलान तपासण्यासाठी नेहमी अधिकृत 'परिवहन सेवा' (echallan.parivahan.gov.in) या पोर्टलचाच वापर करा. कोणत्याही मेसेजमध्ये .gov.in नसलेली लिंक असल्यास त्यावर क्लिक करू नका. तसेच, परवाना रद्द करण्याची किंवा अटकेची धमकी देणारे मेसेज हे सरळ सरळ फसवणुकीचे असल्याचे लक्षण आहे, हे समजून घ्या. अनोळखी व्यक्तीने पाठवलेला QR कोड स्कॅन करणे किंवा थर्ड-पार्टी ॲप्सवरून पेमेंट करणे टाळा, कारण सरकारी दंड भरण्यासाठी सुरक्षित पेमेंट गेटवेचाच वापर केला जातो.
फसवणूक झाल्यास त्वरित करा ही कृती
जर तुमची अशी फसवणूक झाली असेल, तर वेळ न घालवता राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलवर (NCRP) तक्रार नोंदवा किंवा 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनांमध्ये पहिल्या 2 तासांत (Golden Hours) केलेली तक्रार तुमचे पैसे परत मिळवून देण्यास मदत करू शकते. नेहमी लक्षात ठेवा, तंत्रज्ञान जितके सोपे आहे, तितकेच ते सतर्क न राहिल्यास धोक्याचे ठरू शकते.