NEET UG Paper Leak: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परीक्षेपूर्वीच लाखो रुपयांना विकल्या गेलेल्या एका 'नमुना पेपर'मधील चक्क 140 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे विचारले गेल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. या प्रकारामुळे राजस्थान आणि उत्तराखंडसह देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, राजस्थानच्या 'विशेष कृती गटाने' (SOG) या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
केरळ कनेक्शन आणि 300 प्रश्नांचे गौडबंगाल
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, परीक्षेपूर्वी एक 'गेस पेपर' विद्यार्थ्यांमध्ये प्रसारित करण्यात आला होता. तपासादरम्यान असे आढळले की, या पेपरमधील एकूण 300 प्रश्नांपैकी 140 प्रश्न प्रत्यक्ष NEET UG 2026 च्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळणारे होते. धक्कादायक बाब म्हणजे, हा पेपर केरळमधून राजस्थानमधील सिकरपर्यंत पोहोचवण्यात आला होता. यामध्ये आंतरराज्यीय रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता असून, काही एजंटांनी 'खात्रीशीर पेपर' देण्याचे आश्वासन देऊन पालकांकडून मोठी रक्कम उकळल्याचेही समोर येत आहे.
NTA चे स्पष्टीकरण आणि सुरक्षा व्यवस्था
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, परीक्षा अत्यंत कडक सुरक्षा आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) सक्षम CCTV पाळत ठेवून पार पडली आहे. बायोमेट्रिक पडताळणी आणि प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक यामुळे पेपर फुटण्याची शक्यता कमी असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. NTA ने या प्रकरणाची सर्व माहिती 8 मे रोजीच तपास यंत्रणांकडे सोपवली असून, पूर्ण तपास होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा – 11th Admission 2026: विद्यार्थ्यांनो तयार व्हा! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 11 मेपासून सुरुवात
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
गेल्या काही वर्षांपासून NEET परीक्षेतील अनियमिततांचे आरोप वारंवार होत असल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तपासात पेपरफुटीचा आरोप सिद्ध झाला, तर लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आता सर्वांचे लक्ष तपास यंत्रणांच्या अंतिम अहवालाकडे लागले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.