गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकल कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आली आहे, अशातच मुंबई लोकलसंदर्भात आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंबरनाथ येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक दिव्यांग व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडताना पाहायला मिळत आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी एक दिव्यांग व्यक्ती ‘वॉकर’च्या साहाय्याने एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वेरुळ ओलांडताना दिसत आहे. यावेळी लोकल येतानाचे दिसताच इतर लोक देखील रेल्वेरुळावर उतरून त्या दिव्यांग व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर चढवण्याचा प्रयत्न करताना दिसले. इतकचं नव्हे तर या प्रकारामुळे स्थानकावर येणाऱ्या एका लोकलला वेग कमी करावा लागला असून दिव्यांग व्यक्तीच्या या वागणुकीमुळे सर्व स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे अनेकजण यातून दिसून येणाऱ्या नागरिकत्वाच्या जाणिवेच्या अभावावर टीका करत आहेत, तसेच वर्दळीच्या स्थानकांवर अशा प्रकारची धोकादायक वर्तणूक का घडते, असा प्रश्नही उपस्थित करत आहेत. गर्दीच्या वेळेत रुळ ओलांडताना समोरून आलेल्या लोकलला चक्क वेग कमी करावा लागला. क्षणभराचा विलंब झाला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचा हा कसला अट्टहास? मुंबई लोकलमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना होत असणाऱ्या अपघातांच्या घटना घडत असल्याचे सातत्याने समोर येत राहतात. मात्र असे असले तरीही अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे दिसून येते. अशातच मुंबई लोकलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडणे म्हणजे थेट मृत्यूला निमंत्रण या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.