सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक तरुण मैदा किंवा गव्हाच्या पिठाचे मिश्रण तयार करताना दिसत आहे. हे मिश्रण स्वच्छ जागेत नव्हे, तर तळमजल्यावर तयार केले जात आहे. इतकचं नव्हे तर सोयाबीन चाप बनवण्यासाठी जे पीठ मळले जाते त्यात एक तरुण पीठाभोवती लोळत आहे. तसेच तर इतर कामगार पाईपद्वारे त्यावर पाणी ओतत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा हॉटेलमधील जेवण जेवायचे का नाही हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित व्हिडिओ नोएडामधील असून हा व्हिडिओ सेक्टर 27 मधील आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच अन्न सुरक्षा विभागाच्या पथकांनी दिवसभर दुकानात शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. व्हिडिओ व्हायरल होताच, लोकांनी सोयाबीन चाप बनवण्याच्या अस्वच्छ पद्धतींविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून लोक संताप व्यक्त करत आहेत.