Wednesday, April 22, 2026 11:43:52 PM

TDS Exemption: करदात्यांसाठी मोठी खुशखबर! 15G-15H ऐवजी Form 121 लागू; TDS टाळणं आता होणार सोपं

नवीन आयकर नियमांनुसार 15G आणि 15H फॉर्म रद्द करून Form 121 लागू करण्यात आला असून यामुळे टीडीएस टाळणे अधिक सोपे झाले आहे करदात्यांसाठी ही प्रक्रिया आता अधिक डिजिटल आणि सुलभ झाली आहे

tds exemption करदात्यांसाठी मोठी खुशखबर 15g-15h ऐवजी form 121 लागू tds टाळणं आता होणार सोपं

TDS Exemption: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच आयकर विभागाने करप्रणाली अधिक सोपी आणि डिजिटल करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे. याचाच एक भाग म्हणून आता जुने फॉर्म 15G आणि 15H रद्द करण्यात आले असून त्यांच्या जागी ‘Form 121’ हा नवीन फॉर्म लागू करण्यात आला आहे. या बदलामुळे सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

आतापर्यंत बँक एफडी, पोस्ट ऑफिस ठेवी किंवा इतर गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस लागू होऊ नये यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. 60 वर्षांखालील व्यक्तींना 15G आणि ज्येष्ठ नागरिकांना 15H भरावा लागायचा. मात्र आता या दोन्ही फॉर्मची गरज संपली असून सर्वांसाठी एकच ‘Form 121’ लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा:SC On Fraudulent Accounts: फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; बँकांना मिळाले अमर्याद अधिकार; सर्वोच्च न्यायालयाने दिला 'हा' मोठा निकाल

Form 121 हा एक प्रकारचा सेल्फ-डिक्लरेशन फॉर्म आहे. यामध्ये करदाते आपले एकूण वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्याचे जाहीर करतात. त्यामुळे बँक किंवा इतर वित्तीय संस्था त्यांच्या उत्पन्नावर टीडीएस कापत नाहीत. या नव्या पद्धतीमुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि एकसमान झाली आहे.

हा फॉर्म प्रामुख्याने व्याज, लाभांश किंवा इतर काही उत्पन्नावर टीडीएस टाळण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. बँक ठेवी, पोस्ट ऑफिस योजना, म्युच्युअल फंड, विमा कमिशन, निवृत्तीवेतन किंवा भाडे यांसारख्या विविध उत्पन्न प्रकारांसाठी हा फॉर्म वापरता येईल. त्यामुळे करदात्यांना एकाच फॉर्मद्वारे अनेक गोष्टींचं व्यवस्थापन करणं सोपं होणार आहे.

Form 121 कोण भरू शकतो, याबाबतही काही अटी आहेत. भारतातील रहिवासी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तसेच हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) हा फॉर्म भरू शकतात. मात्र कंपन्या, भागीदारी संस्था आणि अनिवासी भारतीय यांना हा फॉर्म वापरता येणार नाही.

हेही वाचा: Affordable Recharge Plans: मोबाईल रिचार्ज आता होणार स्वस्त; TRAI कडून दूरसंचार कंपन्यांना 'स्वस्त प्लॅन्स' अनिवार्य

हा फॉर्म भरताना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये पॅन कार्ड, बँक खात्याचा तपशील, उत्पन्नाची माहिती, वयाचा पुरावा आणि अंदाजित वार्षिक उत्पन्न यांचा समावेश असतो. फॉर्म सादर केल्यानंतर संबंधित संस्था तुमची माहिती तपासून एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UIN) देईल. त्यानंतर ही माहिती आयकर विभागाकडे पाठवली जाते.

या फॉर्मचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो एकदा भरल्यानंतर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी वैध राहतो. त्यामुळे वारंवार फॉर्म भरण्याची गरज उरत नाही. यामुळे करदात्यांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचणार आहेत.

Form 121 मुळे करप्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल झाली आहे. विशेषतः सामान्य नागरिकांसाठी हा बदल फायदेशीर ठरणार असून टीडीएसपासून दिलासा मिळवण्यासाठी हा फॉर्म वेळेवर भरणं महत्त्वाचं ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री