Fuel Price Update : वाहनधारकांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 4 वेळा वाढ झाल्याने इंधनाच्या किमती प्रति लिटर सुमारे 7.50 रुपयाने वाढल्या आहेत. गेल्या 4 वर्षांतील ही सर्वात मोठी सलग दरवाढ मानली जात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही वाढ इथेच थांबणार नसून पुढील 1 ते 2 महिन्यांत जागतिक परिस्थितीमुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील तणाव आणि अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक तेल पुरवठ्यावर संकटाचे सावट
ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक 'जेपी मॉर्गन'ने सादर केलेल्या विश्लेषणानुसार, जगातील एकूण तेलसाठ्यापेक्षा बाजारात प्रत्यक्ष उपलब्ध असलेले वापरण्यायोग्य तेल अधिक महत्त्वाचे ठरते. सध्या याच सक्रिय पुरवठ्यात मोठी घट होत असल्याने तेल बाजारावर दबाव वाढला आहे. याची तुलना मानवी शरीरातील रक्तदाबाशी करण्यात आली असून, शरीरात किती रक्त आहे यापेक्षा ते किती वेगाने प्रवाहित होते हे अधिक महत्त्वाचे असते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दैनंदिन पुरवठ्यात मोठी घट होण्याची शक्यता
जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्स यांच्या अहवालानुसार, 2019 च्या सुरुवातीला जगात 8.4 अब्ज बॅरल्स तेलसाठा होता, मात्र त्यातील केवळ 800 दशलक्ष बॅरल्स तेल प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होते. जर होर्मुझ सामुद्रधुनी जूनपर्यंत बंद राहिली, तर जागतिक बाजारात दररोज 5.5 दशलक्ष बॅरल्स तेलाची कमतरता निर्माण होऊ शकते. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे दररोज 10 ते 13 दशलक्ष बॅरल्स पुरवठा कमी होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मे महिन्यात जागतिक साठ्यात दररोज 8.7 दशलक्ष बॅरल्सची घट नोंदवण्यात आली.
धोरणात्मक साठे संपत असल्याची चिंता
तेल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विविध देशांनी आपले धोरणात्मक तेलसाठे बाजारात उपलब्ध करून दिल्यामुळे सध्या तेलाचे दर 100 डॉलर्सच्या खाली टिकून आहेत. मात्र, हे साठे झपाट्याने कमी होत असल्याने जुलैपासून परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. 'एक्झॉन'चे वरिष्ठ उपाध्यक्ष नील चॅपमन आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ माईक वर्थ यांनीही याबाबत इशारा दिला आहे.
हेही वाचा – PIB Fact Check: आरबीआयने गुपचूप 12 अब्ज डॉलर्सचे सोने विकले का? अखेर सरकारने केला मोठा खुलासा
2027 पर्यंत संकट कायम राहण्याची शक्यता
आखाती प्रदेशातील तेल कंपन्यांच्या अंदाजानुसार, जरी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पुन्हा सुरू झाले तरी तेल बाजार पूर्वपदावर येण्यासाठी किमान 2027 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यानंतर विविध देशांना आपले धोरणात्मक साठे पुन्हा भरावे लागतील, ज्यामुळे कच्च्या तेलाची मागणी आणखी वाढेल. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याबरोबरच भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.