Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोनं आणि चांदीच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. दिवाळीच्या तोंडावर दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारपर्यंत सोन्याच्या बाजारात थोडी स्थिरता होती, परंतु शनिवारीच भावात तब्बल वाढ झाली आणि गुंतवणूकदारांसह दागिन्यांच्या खरेदीदारांना मोठा धक्का बसला आहे.
गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात जवळपास 5,500 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेटचे एक तोळे सोनं सध्या 1,24,260 रुपये इतके झाले आहे, तर 10 तोळ्यांच्या खरेदीसाठी 12,42,600 रुपये मोजावे लागतील. यामुळे 24 कॅरेट सोन्याने पुन्हा एकदा महागाईचा उच्चांक गाठला आहे.
फक्त 24 कॅरेटच नव्हे, तर 22 कॅरेट सोन्याच्याही दरात वाढ झाली आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचे एक तोळे 1,13,900 रुपये इतके झाले असून, 10 तोळ्यांच्या खरेदीसाठी तब्बल 11,39,000रुपये लागणार आहेत. म्हणजेच, 22 कॅरेटच्या दरात एका दिवसात 5,000 रुपयांनी वाढ झाली आहे. दागिन्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे असणारे हे सोनं आता अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
दरम्यान, 18 कॅरेट सोन्याच्या भावातही चांगलीच वाढ झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचे एक तोळे आता 93,190 रुपये इतके झाले असून, 10 तोळ्यांसाठी 9,31,900 रुपये खर्च करावे लागतील. या श्रेणीतील सोनं प्रामुख्याने हलक्या दागिन्यांमध्ये वापरले जाते, मात्र या दरवाढीमुळे या विभागातील खरेदीही काहीशी मंदावू शकते.
फक्त सोनं नव्हे, तर चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात 3 रुपयांची वाढ होऊन 1 ग्रॅम चांदीचा भाव 177 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 1,77,000 रुपये मोजावे लागतील. शुक्रवारीही चांदीच्या भावात 3 रुपयांनी वाढ झाली होती, त्यामुळे सलग दोन दिवसांपासून चांदी महाग होत आहे.
दर वाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, मध्यपूर्वेतील तणाव आणि डॉलरच्या मजबूत स्थितीचा परिणाम दिसून येतो आहे. जागतिक स्तरावर गुंतवणूकदार पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे म्हणजेच सोन्याकडे वळत आहेत. त्यामुळे मागणी वाढल्याने किंमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
आगामी काही दिवसांतही दरवाढीचा ट्रेंड कायम राहू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोन्याची मागणी मोठी आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीपूर्वी दर तपासूनच व्यवहार करावेत, असा सल्ला सुवर्णतज्ज्ञ देत आहेत.