Gold Price Today: सलग दोन दिवस किमती स्थिर राहिल्यानंतर 04 ऑगस्ट 2026 रोजी सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवली गेली आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकन मध्यवर्ती बँक काय पावले उचलणार, याकडे गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष लागले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी मंदावली आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्राकडून मागणी कमी झाल्याने गेल्या 6 दिवसांपासून स्थिर असणाऱ्या चांदीच्या भावावरही दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत सराफा बाजारात सावधगिरीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली आणि मुंबईसह प्रमुख शहरांतील सोन्याचे ताजे दर
– देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,44,360 रुपये, 22 कॅरेटचा भाव 1,32,340 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 1,08,300 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला.
– मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,210 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,32,190 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,08,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
– चेन्नईमध्ये सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत थोडे अधिक असून तिथे 24 कॅरेटसाठी 1,44,560 रुपये, 22 कॅरेटसाठी 1,32,510 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,10,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
सहा दिवसांच्या स्थिरतेनंतर चांदी प्रति किलो 100 रुपयांनी स्वस्त
गेल्या 6 दिवसांपासून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता, मात्र आज प्रति किलो 100 रुपयांची घट झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या प्रमुख शहरांमध्ये सध्या 1 किलो चांदीचा दर 2,34,900 रुपये इतका झाला आहे. यापूर्वी 28 जुलै रोजी चांदीच्या दरात एकाच दिवशी 5,000 रुपयांची मोठी घसरण झाली होती. यानंतर बाजारात काही काळ स्थिरता आली होती. औद्योगिक क्षेत्रातील मंदी आणि जागतिक बाजारातील घडामोडींमुळे चांदीच्या दरावर हा परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गुंतवणूकदारांची सावध भूमिका अन् तज्ज्ञांचे मत
अमेरिकेतील महागाईच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सध्या मोठी खरेदी टाळून बाजारातील पुढील संकेतांची वाट पाहत आहेत. अमेरिकेतील नॉन-फार्म पेरोल (Non-Farm Payroll) अहवाल आणि रोजगाराशी संबंधित आगामी आकडेवारीवर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. या आर्थिक आकडेवारीच्या आधारे व्याजदरांबाबत होणाऱ्या निर्णयांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या जागतिक भावावर दिसून येईल. स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि विविध शहरांतील ज्वेलर्स असोसिएशनच्या धोरणांमुळे वेगवेगळ्या शहरांतील दरांमध्ये काही प्रमाणात तफावत आढळून येते.