Google Play Store: डिजिटल सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी गुगलने मोठी कारवाई करत तब्बल 17.5 लाखांहून अधिक संशयास्पद आणि धोरणभंग करणाऱ्या अॅप्सना प्ले स्टोअरवर प्रकाशित होण्यापासून थांबवले आहे. कंपनीच्या ताज्या सुरक्षा अहवालात ही माहिती देण्यात आली असून, या अॅप्समुळे आर्थिक फसवणूक, मालवेअर, स्पायवेअर आणि वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता. गुगलच्या मते, 2025 मध्ये AI-आधारित प्रगत तपासणी यंत्रणांचा वापर करून अॅप्सची काटेकोर छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत धोरणांचे उल्लंघन करणारी, लपवलेल्या सदस्यता योजना राबवणारी किंवा वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती गैरवापरासाठी गोळा करणारी अॅप्स आधीच ओळखून रोखण्यात आली. त्यामुळे लाखो वापरकर्ते संभाव्य फसवणुकीपासून वाचले.
याशिवाय, सुमारे 80 हजारांहून अधिक डेव्हलपर खाती बंद करण्यात आली. ही खाती वारंवार नियम मोडत होती किंवा संशयास्पद व्यवहारांशी संबंधित होती. गुगलने स्पष्ट केले की, प्ले स्टोअर अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ अॅप्सच नव्हे तर चुकीच्या हेतूने काम करणाऱ्या विकसकांवरही कारवाई करणे आवश्यक आहे. गोपनीयतेच्या दृष्टीनेही कंपनीने मोठी पावले उचलली आहेत. सुमारे 2.5 लाखांपेक्षा अधिक अॅप्सना वापरकर्त्यांच्या संवेदनशील डेटामध्ये अनावश्यक प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. डेटा सेफ्टी सेक्शन आणि पॉलिसी इनसाइट्ससारख्या साधनांच्या मदतीने विकसकांना अधिक पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने अॅप विकसित करण्यास प्रवृत्त केले जात आहे.
स्पॅम आणि बनावट रेटिंग्जविरोधातही गुगलने मोहीम राबवली. जवळपास 160 दशलक्ष संशयास्पद रिव्ह्यू आणि रेटिंग्ज ब्लॉक करण्यात आले. यामुळे वापरकर्त्यांना अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळण्यास मदत झाली आहे. कंपनीची जनरेटिव्ह AI प्रणाली आता अॅप्स प्ले स्टोअरवर येण्यापूर्वीच त्यांचे सखोल विश्लेषण करते आणि संभाव्य धोके ओळखते.
गुगल प्ले प्रोटेक्ट प्रणालीतही सुधारणा करण्यात आली आहे. ही प्रणाली अॅप्समधील संशयास्पद वर्तन ओळखून स्वयंचलितपणे त्यांना ब्लॉक करते. गेल्या वर्षातच 266 दशलक्ष धोकादायक अॅप इंस्टॉलेशन्स रोखण्यात आल्या, तसेच सुमारे 8.7 लाख उच्च-जोखमीच्या अॅप्सपासून वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यात आले. याशिवाय, फोन कॉलदरम्यान होणाऱ्या फसवणुकीवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन फीचरही सादर करण्यात आले आहे. या सुविधेमुळे कॉलदरम्यान प्ले प्रोटेक्ट बंद करता येत नाही, त्यामुळे स्कॅमर्सना वापरकर्त्यांना फसवणे कठीण झाले आहे.