नवी दिल्ली : देशभरात 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू झाले आहेत. या बदलांमुळे दैनंदिन वापरातील जवळपास सर्व वस्तूंवर कर कमी झाला असून, बहुतांश वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तरीदेखील काही ठिकाणी ग्राहकांना याचा लाभ मिळत नाही, अशा तक्रारी समोर येत आहेत.
ग्राहकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने तक्रार नोंदविण्याची विशेष व्यवस्था केली आहे. जीएसटी कपातीचा फायदा जर विक्रेत्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला नसेल, तर नागरिक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1915 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात. तसेच 8800001915 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर देखील तक्रार नोंदविण्याची सोय आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (CBIC) याबाबत स्पष्ट केले की, नागरिकांना तक्रार निवारणासाठी INGRAM पोर्टलचाही पर्याय उपलब्ध आहे. सोशल मीडियावरही ग्राहकांकडून अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत.
जीएसटी संरचनेतील मोठ्या बदलांनुसार, यापूर्वीचे चार कर स्लॅब कमी करून फक्त दोन करण्यात आले आहेत, 5 टक्के आणि 18 टक्के. त्यामुळे पूर्वी 18 टक्के कर लागू असलेल्या दैनंदिन वस्तू आता केवळ 5 टक्क्यांवर उपलब्ध आहेत. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकल्यामुळे जवळपास 99 टक्के वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
सरकारने कंपन्या आणि विक्रेत्यांवर काटेकोर लक्ष ठेवले आहे. दरम्यान, अनेक कंपन्यांनी स्वतःहून दर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र, काही व्यवसायांकडून अपेक्षित कपात ग्राहकांना न मिळाल्याची माहिती मिळत असून, त्यावर तक्रार नोंदविण्यासाठी शासनाने वरील सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.