ITR E-Verification: आर्थिक वर्ष 2025-26 (करनिर्धारण वर्ष 2026-27) साठी ITR दाखल करण्याची 31 जुलै ही अंतिम तारीख आता अगदी तोंडावर आली आहे. तुम्ही तुमचा आयटीआर आधीच भरला असेल, तर एवढ्यावरच तुमचे काम पूर्ण होत नाही. कर विवरणपत्र दाखल केल्यानंतर वेळेत त्याचे ई-व्हेरिफिकेशन (e-Verification) करणे अत्यंत आवश्यक आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार, फॉर्म सबमिट केल्यापासून 30 दिवसाच्या आत ई-व्हेरिफिकेशन पूर्ण केले नाही, तर दाखल केलेला आयटीआर अमान्य किंवा अवैध मानला जाऊ शकतो.
आयटीआर ई-व्हेरिफिकेशन म्हणजे काय आणि ते का आवश्यक आहे?
जेव्हा एखादी व्यक्ती आयटीआर दाखल करते, तेव्हा तो केवळ आयकर विभागाकडे जमा होतो. परंतु, जोपर्यंत करदाता त्याची पडताळणी करत नाही, तोपर्यंत त्यावर कोणतीही प्रक्रिया (processing) सुरू होत नाही. पूर्वी यासाठी 120 दिवसांचा कालावधी दिला जात होता, परंतु 1 ऑगस्ट 2022 पासून हा नियम बदलून 30 दिवसाचा करण्यात आला आहे. त्यामुळे आता निश्चित मुदतीतच पडताळणी करणे बंधनकारक आहे.
ई-व्हेरिफिकेशनचे 5 अत्यंत सोपे पर्याय
करदात्यांच्या सुविधेसाठी आयकर विभागाने ऑनलाईन पडताळणीचे 5 सोपे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत:
आधार OTP: आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर प्राप्त होणाऱ्या OTP च्या माध्यमातून सर्वात जलद पडताळणी करता येते.
बँक खात्याद्वारे EVC: ई-फायलिंग पोर्टलवर पूर्व-प्रमाणित (Pre-validated) बँक खात्याचा वापर करून Electronic Verification Code (EVC) द्वारे व्हेरीफाय करता येते.
डीमॅट खात्याद्वारे EVC: पूर्व-प्रमाणित डीमॅट खात्याद्वारे EVC जनरेट करूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
नेट बँकिंग: अधिकृत बँकांच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून थेट ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करून पडताळणी शक्य आहे.
डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC): करदाते DSC च्या मदतीने देखील ई-व्हेरिफिकेशन करू शकतात. (मात्र, आयटीआर भरताना 'e-Verify Later' हा पर्याय निवडल्यास नंतर DSC चा वापर करता येत नाही).
हेही वाचा – Gold-Silver Rate Today: सराफा बाजारात पुन्हा तेजीची लाट; सोने-चांदी महाग, पाहा 22 आणि 24 कॅरेटचा भाव
ऑनलाईन ई-व्हेरिफिकेशन न केल्यास काय पर्याय आहे?
ऑनलाईन पद्धतीव्यतिरिक्त करदात्यांकडे आयटीआर फॉर्मची प्रत्यक्ष प्रत (ITR-V) पाठवण्याचा पर्याय असतो. यासाठी आयटीआर सबमिट केल्यापासून 30 दिवसाच्या आत ITR-V वर स्वाक्षरी करून ते 'सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC), बेंगळुरू' येथे टपालाने पाठवावे लागते. परंतु कागदपत्र हरवण्याचा धोका टाळण्यासाठी आणि रिफंड प्रक्रिया जलद व्हावी यासाठी ऑनलाईन ई-व्हेरिफिकेशन हाच सर्वात सोयीस्कर मार्ग मानला जातो. ई-व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यास स्क्रीनवर Success Message आणि Transaction ID दिसतो, तसेच नोंदणीकृत ईमेलवर त्याची पोचपावती पाठवली जाते.