Solar AC : उन्हाळ्याच्या कडाक्यात एअर कंडिशनर (AC) वापरणे सुखद असले तरी, त्यामुळे येणारे अव्वाच्या सव्वा वीज बिल सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकते. या समस्येवर उपाय म्हणून आता सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून एसी चालवणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला हायब्रीड एसी (Hybrid AC) मॉडेलची गरज भासते, जे सौर ऊर्जा आणि ग्रीड अशा दोन्हीवर काम करू शकतात. बाजारामध्ये 1.5 Ton क्षमतेच्या हायब्रीड एसीची किंमत साधारणपणे 40,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान आहे.
सोलर पॅनेलची गरज आणि क्षमता
सोलरवर एसी चालवण्यासाठी योग्य क्षमतेचे सोलर पॅनेल बसवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला 1 Ton क्षमतेचा एसी चालवायचा असेल, तर त्यासाठी किमान 1.5 KW क्षमतेच्या सोलर पॅनेलची गरज भासते. दिवसाच्या वेळी हा एसी थेट सौर ऊर्जेवर चालेल, मात्र रात्रीच्या वेळी एसी वापरण्यासाठी तुम्हाला बॅटरी बॅकअप किंवा ग्रीड वीज पुरवठ्याचा वापर करावा लागेल. सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 1.5 KW सोलर पॅनेलची किंमत 1,20,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत आहे.
हेही वाचा – Laptop Speed Increase Tips: नवा लॅपटॉप कशाला? 'या' 5 सोप्या ट्रिक्स वापरून तुमचा जुना लॅपटॉप होईल सुपरफास्ट
सरकारी सबसिडीचा मोठा फायदा
सोलर पॅनेल बसवण्याचा सुरुवातीचा खर्च जास्त वाटत असला, तरी केंद्र सरकारच्या 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) अंतर्गत मोठी सबसिडी उपलब्ध आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही अनुदान मिळते, ज्यामुळे सोलर पॅनेल बसवण्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो. एकदा गुंतवणूक केल्यानंतर पुढील अनेक वर्षे तुम्ही मोफत किंवा अतिशय कमी दरात एसीचा आनंद घेऊ शकता. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या एसीमुळे एका वेळी होणारा खर्च जास्त वाटला तरी, दीर्घकाळासाठी वीजबिलापासून सुटका मिळते. तसेच, लाईट गेले म्हणून एसी बंद होण्याचे टळते.
हायब्रीड मॉडेल आणि देखभाल
सोलर एसीसाठी वापरले जाणारे हायब्रीड युनिट हे प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असते. सध्या अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या हे एसी आणि सोलर पॅनेल उपलब्ध करून देतात. हे मॉडेल अशा प्रकारे डिझाइन केलेले असतात की ते वीज पुरवठ्यातील चढ-उतार सहन करू शकतात. यामुळे केवळ पैशांची बचत होत नाही, तर पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होते. वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी वाढणाऱ्या वीज बिलावर हा एक कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय ठरत आहे.
हेही वाचा – LPG ATM : आता गॅस सिलिंडर मिळणार 'एटीएम' मधून! देशात कुठे सुरू झालीय ही सुविधा?