Robotics: पाण्यावर चालणारा ‘सॉफ्ट रोबोट’ तयार! नवीन ‘HydroSpread’ तंत्रज्ञानामुळे विज्ञानात क्रांतीची सुरुवात

HydroSpread या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्यावर चालणारे सॉफ्ट रोबोट्स तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. हे रोबोट भविष्यात पर्यावरण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनात उपयुक्त ठरतील.

Robotics: पाण्यावर चालणारा ‘सॉफ्ट रोबोट’ तयार! नवीन ‘HydroSpread’ तंत्रज्ञानामुळे विज्ञानात क्रांतीची सुरुवात

Robotics: सायन्स आणि रोबोटिक्सच्या दुनियेत एक नवी झेप घेतली गेली आहे. अमेरिकेतील वर्जीनिया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, जे भविष्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. ‘HydroSpread’ असं या नव्या तंत्रज्ञानाचं नाव असून, त्याच्या मदतीने पाण्याच्या पृष्ठभागावर चालणारे अतिशय हलके आणि लवचिक सॉफ्ट रोबोट्स तयार करता येतात.

या नव्या शोधाने सध्या विज्ञान जगतात उत्सुकता निर्माण केली असून, भविष्यात पर्यावरण निरीक्षण, आरोग्य सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. हा रोबोट म्हणजे पाण्यावर चालणाऱ्या कीटकांप्रमाणे काम करतो, तोही न ढळता आणि न बुडता!

हेही वाचा: Zoho Arattai: WhatsApp आणि Telegram झाले फेल! ‘Arattai’ अ‍ॅपमध्ये आहे असं खास फीचर जे कुठेच नाही; जाणून घ्या

HydroSpread तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य काय?

आतापर्यंत सॉफ्ट रोबोट्स तयार करताना त्यांचं उत्पादन पारंपरिक पद्धतीने काचेसारख्या सपाट आणि कठीण पृष्ठभागावर केलं जात होतं. नंतर त्या फिल्म्स (लवचिक थर) पाण्यावर हलवाव्या लागत, ज्यामुळे त्या तुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असायचा.

पण HydroSpread या नव्या प्रक्रियेत रोबोट्स थेट पाण्यावरच तयार होतात! या तंत्रज्ञानात पॉलिमरचे लहान थेंब पाण्याच्या पृष्ठभागावर टाकले जातात, जे आपोआप पसरून एकसंध आणि अतिशय बारीक फिल्म तयार करतात. त्यानंतर लेझर बीमद्वारे या फिल्म्सना हवे त्या आकारात कापता येतं मग तो युनिव्हर्सिटीचा लोगो असो की अत्यंत सूक्ष्म डिझाईन.

पाण्यावर चालणारे प्रोटोटाइप रोबोट्स तयार

वैज्ञानिकांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन छोट्या सॉफ्ट रोबोट्स तयार केले आहेत  HydroFlexor आणि HydroBuckler.

  • HydroFlexor हा जलप्रवास करताना माश्याच्या परांप्रमाणे हालचाल करतो.

  • HydroBuckler हा रोबोट पाण्यावर चालणाऱ्या कीटकांप्रमाणे आपले "पाय" वाकवून चालतो.

या रोबोट्सना प्रयोगशाळेत इन्फ्रारेड हीटरद्वारे ऊर्जा पुरवण्यात आली. उष्णतेमुळे त्यांचं स्वरूप बदलत गेलं आणि ते पाण्यावर हालचाल करू लागले. या प्रक्रियेमुळे रोबोट्सच्या गती आणि दिशेवर अचूक नियंत्रण ठेवता आलं.

हेही वाचा: Snapchat New Rule: स्नॅपचॅटने काढला नवीन नियम, आता स्टोरेजसाठी मोजावे लागणार पैसे

भविष्यातील उपयोग काय असू शकतात?

या रोबोट्सचा वापर पाण्याच्या प्रदूषणाची तपासणी, नैसर्गिक आपत्तींनंतर सर्व्हे, आणि अगदी वैद्यकीय उपकरणांमध्येही केला जाऊ शकतो. भविष्यात यांना सौर ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र किंवा सूक्ष्म हीटर्सद्वारे चालवता येऊ शकतं ज्यामुळे हे रोबोट्स पूर्णपणे स्वायत्त (Autonomous) होतील.

या नव्या शोधामुळे केवळ रोबोटिक्समध्येच नव्हे, तर फ्लेक्सिबल इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणं, आणि स्मार्ट सेन्सर्समध्येही मोठी क्रांती घडू शकते.

एक पाऊल भविष्याकडे…

प्रोफेसर बाओक्सिंग झू आणि त्यांच्या टीमचं हे संशोधन केवळ एक प्रयोग नाही, तर भविष्यातील ‘स्मार्ट’ आणि ‘सस्टेनेबल’ तंत्रज्ञानाचा पाया ठरू शकतं. पाण्यावर चालणारे रोबोट्स ही आता केवळ कल्पना राहिलेली नाही, तर प्रत्यक्ष वास्तव बनत चालली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number