गेल्या काही दिवसांपूर्वी ओडिशातील एका व्यक्तीने बहिणीच्या खात्यातून 20 हजार रुपये काढण्यासाठी तिचा सांगाडा बँकेत घेऊन गेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला होता. मोठी बहिण कालरा मुंडा हिच्या मृत्यूनंतर तिच्या खात्यात असलेले 20 हजार रुपये काढण्यासाठी जीतू मुंडा या व्यक्तीला पुरावे नसल्यामुळे बॅंकेकडून ती रक्कम देण्यास नकार देण्यात आला. यामुळे त्यांना चक्क स्वतःच्या मृत बहिणीचा सांगाडा पुरावा म्हणून बॅंकमध्ये घेऊन जावा लागला.
यानंतर अनेकांना असे प्रश्न पडू लागले की, जीतू यांना त्यांच्या बहिणीच्या खात्यातील पैसे मिळाले की नाही? तर या प्रकरणासंबधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ओडिशाचे रहिवासी जीतू मुंडा यांना 20 हजारांऐवजी लाखोंची धनप्राप्ती झाली आहे. 20 हजारांसाठी एवढा खाटापिटा करणाऱ्या जीतू यांना तब्बल 15 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
सोशल मीडियावर जीतू यांचा बहिणीचा सांगडा बॅंकमध्ये नेतानाचा व्हिडिओ पाहून देशातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर अनेक संस्थांनी त्यांना आर्थिक मदत केली. जीतू यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत आणि त्यांच्यासोबत झालेल्या प्रकरणाची दखल घेत 'फिजिक्स वाला' सीईओ अलख पांडे यांनी जीतू यांना 10 लाख रुपयांची मदत केली, तर दुसरीकडे राजस्थानचे कृषी मंत्र्यांनी आपला एका महिन्याचा पगार देत जीतू यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला.