मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या व्यवहारदिवशी म्हणजे सोमवार, 16 मार्च 2026 रोजी व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 लाल निशानावर उघडले. बाजार उघडताच मात्र त्यामध्ये मोठे चढ-उतार दिसून आले. काही वेळ बाजार घसरलेला दिसत होता, तर काही वेळातच निर्देशांक पुन्हा हिरव्या निशानावर पोहोचत होते.
30 समभागांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 148.13 अंकांनी म्हणजेच सुमारे 0.20 टक्क्यांनी घसरत 74,415.79 या पातळीवर उघडला. दुसरीकडे एनएसई निफ्टी 50 निर्देशांकातही सुरुवातीला घसरण दिसून आली. निफ्टी 35 अंकांनी म्हणजे 0.15 टक्क्यांनी घसरत 23,116.10 या पातळीवर व्यवहार सुरू झाले. मात्र सकाळी सुमारे 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत बाजारात काहीशी सुधारणा दिसून आली. त्या वेळी सेन्सेक्स सुमारे 58 अंकांनी वाढून 74,622 अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 26 अंकांनी वाढून 23,177 या पातळीवर पोहोचला होता.
दरम्यान, बीएसईमधील काही प्रमुख समभागांमध्ये तेजी दिसून आली. बातमी लिहीपर्यंत आयटीसी, टाटा स्टील, कोटक बँक, एनटीपीसी आणि सन फार्मा हे समभाग टॉप गेनर म्हणून पुढे होते. तर महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा या समभागांमध्ये घसरण दिसून येत होती.
यापूर्वी शुक्रवारी, 13 मार्च 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्या दिवशी व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 1470.50 अंकांनी म्हणजे 1.93 टक्क्यांनी घसरत 74,563.92 अंकांवर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 488.05 अंकांनी म्हणजे 2.06 टक्क्यांनी घसरत 23,151.10 या पातळीवर बंद झाला होता.
13 मार्च 2026 रोजी बीएसई निर्देशांकातील हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारती एअरटेल हे काही मोजके समभाग वाढीसह बंद झाले होते. तर एलअँडटी, टाटा स्टील, एसबीआय, मारुती आणि अॅक्सिस बँक या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली होती.
तसेच निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी स्मॉलकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी मिडकॅप 100 या प्रमुख निर्देशांकांमध्येही घसरण नोंदवण्यात आली होती. शुक्रवारी बीएसईमधील 30 समभागांपैकी फक्त दोन समभाग वाढीसह बंद झाले होते, तर उर्वरित 28 समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावध वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!