Gold Silver Rate: आज देशातील कमोडिटी फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अनपेक्षित घसरण नोंदवली गेली. सकाळच्या व्यवहारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत लक्षणीय घट झाली असून, यामागे गुंतवणूकदारांनी सुरू केलेली नफा वसुली आणि अमेरिकन डॉलरची वाढलेली मजबूती हे प्रमुख घटक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक पुन्हा एकदा 99 च्या जवळ पोहोचल्यामुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीची मागणी मंदावली आहे.
एमसीएक्सवर सोने-चांदीचे दर घसरले
गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 1,30,288 रुपये नोंदवला. तर मार्च डिलिव्हरीची चांदी 0.08 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्रॅम 1,82,200 रुपये झाली. दरम्यान, गुंतवणूकदारांचे लक्ष आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीकडे लागले आहे. येत्या शुक्रवारी आरबीआय आपल्या प्रमुख धोरणात्मक दरांबाबत निर्णय जाहीर करणार आहे. रेपो दरात कपात झाल्यास गृहकर्ज, वाहन कर्ज आणि व्यावसायिक कर्जांवरील EMI मध्ये दिलासा मिळू शकतो. या निर्णयाचा परिणाम सोने–चांदी तसेच शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – USD vs INR: भारतीय रुपया चार दशकांत सर्वात कमकुवत; डॉलरच्या तुलनेत गाठली विक्रमी नीचांकी पातळी
पुढील आठवडा सोन्या-चांदीसाठी निर्णायक
येत्या आठवड्यात जागतिक बाजारात मोठी हालचाल होऊ शकते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची ओपन मार्केट कमिटी (FOMC) 9 आणि 10 डिसेंबरला धोरणात्मक बैठक घेणार आहे. व्याजदर कपातीची 89 टक्के शक्यता असल्याचा अंदाज रॉयटर्सने व्यक्त केला असून, या संभाव्य निर्णयामुळे सोन्या–चांदीच्या भावात पुन्हा तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठा या बैठकीकडे बारकाईने पाहत आहेत.
हेही वाचा – Save Electricity: छोटासा पण शक्तिशाली 'स्मार्ट प्लग'! जाणून घ्या, या डिव्हाईसने वीज कशी वाचेल..
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)
देशातील महत्त्वाच्या महानगरांमध्येही सोने स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये किरकोळ घट नोंदवली जात आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,31,130 इतका असून 22 कॅरेट सोने 1,20,200, तर 18 कॅरेट सोने 1,00,250 या किमतींना उपलब्ध आहे. मुंबई बाजारात 24 कॅरेट सोने 1,30,360, 22 कॅरेट 1,19,500, आणि 18 कॅरेट 97,780 या दरांनी नोंदवले गेले. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने 1,30,510, 22 कॅरेट 1,19,650, आणि 18 कॅरेट सोने 97,930 इतक्या किमतींना मिळत आहे. कोलकात्यातही सोन्याचे दर कमी असून 24 कॅरेट 1,30,360, 22 कॅरेट 1,19,500, आणि 18 कॅरेट 97,780 इतक्या किमतींवर व्यवहार होत आहे.