देशभरात स्वयंपाकाच्या गॅसची मागणी वाढत असताना सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतीने लोकांना फसवण्यास सुरुवात केली आहे. LPG सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली WhatsApp, SMS आणि सोशल मीडियावर बनावट मेसेज पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
या फसवणुकीत स्कॅमर्स “आता पैसे भरा आणि लगेच गॅस मिळवा” अशा आकर्षक ऑफर्स देतात. अनेकदा हे मेसेज खऱ्या गॅस कंपन्यांसारखे दिसतात, कारण त्यात अधिकृत लोगो आणि नावांचा वापर केला जातो. त्यामुळे सामान्य लोकांना हे खरे वाटते आणि ते दिलेल्या लिंकवर क्लिक करतात. मात्र, त्या लिंक बनावट वेबसाइटकडे घेऊन जातात, जिथे पेमेंटची माहिती भरताच पैसे थेट फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जातात.
या प्रकारात अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. गॅस वितरण जलद करण्याचे आमिष दाखवून लोकांकडून आगाऊ पैसे उकळले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात अधिकृत गॅस कंपन्या अशा प्रकारे कधीही पैसे मागत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा स्कॅमपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, LPG सिलिंडर नेहमी अधिकृत वेबसाइट, अॅप किंवा विश्वसनीय माध्यमांद्वारेच बुक करावा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद मेसेजेसकडे दुर्लक्ष करावे. तसेच, OTP, UPI पिन किंवा बँकिंग माहिती कोणासोबतही शेअर करू नये.
काही प्रसिद्ध व्यक्तींनाही अशा प्रकारचे फसवे मेसेज मिळाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे हा धोका सर्वांसाठीच गंभीर असल्याचे स्पष्ट होते. जर अशा प्रकारचा संशयास्पद मेसेज मिळाला, तर त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.