CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवणे झालं अधिक सोपं; आता थेट एका क्लिकवर मिळणार मदत

या निर्णयामुळे उपचारांसाठी लागणारी मदत अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे.

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवणे  झालं अधिक सोपं; आता थेट एका क्लिकवर मिळणार मदत

मुंबई: ‘आजारपण’ हा शब्दच मुळी काळजाचा ठोका चुकवणारा. त्यातच जर एखादा गंभीर आजार उद्भवला, तर सामान्य माणसाची आर्थिक आणि मानसिक अवस्था अक्षरशः कोलमडून पडते. उपचारांच्या वाढत्या खर्चासाठी पैशांची जुळवाजुळव करताना रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी फरफट आणि हतबलता आपण अनेकदा पाहतो. हीच फरफट कायमची थांबवण्यासाठी आता एक आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. लालफितीच्या कारभारात अडकणारी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ची फाईल आता थेट एका क्लिकवर आली असून, मदतीचा ओघ अत्यंत वेगाने आणि पारदर्शकपणे थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 7 एप्रिल 2026 पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राबवली जाणारी जुनी, कागदी अर्ज प्रक्रिया कायमची इतिहासजमा करण्यात आली आहे.

यापुढे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीसाठी सरकारी कार्यालयांच्या चकरा मारण्याची अजिबात गरज भासणार नाही. यासाठी राज्य सरकारने एक अद्ययावत आणि गतीमान असे नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित केले असून, सर्व कामकाज आता याच डिजिटल मंचावरून पार पडणार आहे.

हेही वाचा: Weather Update : कोकणासह मुंबई-ठाण्यात 48 तासांसाठी अलर्ट; हवामान विभागाकडून नागरिकांसाठी खास आवाहन

या नव्या बदलाचा सर्वाधिक फायदा सामान्य रुग्णांना होणार असला, तरी त्यासाठी रुग्णालयांची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नव्या नियमांनुसार, आता सर्व रुग्णालयांना या पोर्टलवर आपला अधिकृत ई-मेल आयडी नोंदवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ एवढेच नाही, तर प्रत्येक रुग्णालयाला आपली ‘ई-केवायसी’ (E-KYC) प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागेल. जोपर्यंत रुग्णालये ही तांत्रिक पूर्तता करत नाहीत, तोपर्यंत रुग्णांचे अर्ज नव्या प्रणालीत दाखल करून घेता येणार नाहीत. त्यामुळे रुग्णांचे प्राण वेळेवर वाचवण्यासाठी आता रुग्णालयांनीच संवेदनशीलतेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

या डिजिटल क्रांतीचा मुख्य उद्देश म्हणजे प्रशासकीय दिरंगाई थांबवणे आणि मदतीची प्रक्रिया अत्यंत जलद करणे. पूर्वी कागदपत्रांच्या जंजाळात रखडणारी मदत आता अर्जांची झटपट छाननी होऊन अवघ्या काही दिवसांत थेट रुग्णाच्या किंवा संबंधित रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. “वेळेवर मिळणारी मदत हीच खरी मदत” यानुसार, रुग्णाला ऐन उपचारांच्या वेळी आर्थिक बळ मिळवून देण्याचे काम ही नवीन प्रणाली करणार आहे. या सुविधेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा मौल्यवान वेळ, पैसा आणि शारीरिक कष्टही वाचणार आहेत.

तंत्रज्ञानाची जोड देऊन सामान्य माणसाचे जगणे सुकर करण्याच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा लोकाभिमुख आणि धाडसी निर्णय घेतला आहे. तळागाळातील आणि गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी हा निर्णय म्हणजे एक मोठे ‘वरदान’च ठरत आहे. 7 एप्रिल 2026 पासून या नव्या युगाची सुरुवात झाली असून, ज्या रुग्णालयांनी अद्याप पोर्टलवर त्यांची नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. डिजिटल महाराष्ट्राच्या वाटचालीतील हा निर्णय राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल. 

हेही वाचा: Mumbai Aiport Fire Incident: मुंबई विमानतळावर लागली आग; धुराचे लोट आणि प्रवाशांची पळापळ, शॉर्ट सर्किट की घातपात?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number