राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीसंदर्भात महत्त्वाची घोषणा करत लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पहिल्या यादीनंतर आता दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने पात्र शेतकऱ्यांची नावे जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी 22 जुलै रोजी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 533 पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता दुसऱ्या यादीत तब्बल 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश असणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली. सरकार ही योजना टप्प्याटप्प्याने राबवत असून सर्व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण होतील, त्यांची नावे पुढील याद्यांमध्ये समाविष्ट केली जातील. त्यामुळे नाव पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत नसले तरी घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यादीत नाव नसल्यास संबंधित कागदपत्रे आणि माहितीची पडताळणी करून पुढील टप्प्यात नाव समाविष्ट केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेसाठी राज्य सरकारने जवळपास 40 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, पात्र शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकी कर्जाची माफी केली जाणार आहे. लाभार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन आवश्यक त्या दुरुस्त्याही केल्या जातील, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही पात्र शेतकऱ्याला अन्याय होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, यावर्षीच्या खरीप हंगामाबाबत बोलताना कृषिमंत्र्यांनी राज्यातील पेरणीची स्थितीही स्पष्ट केली. अमरावती विभागात सर्वाधिक पेरणी झाली असून ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी पेरणीची नोंद झाली आहे. पावसाच्या परिस्थितीनुसार शेतकरी नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबतही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शरद पवार यांची भेट घेण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, वरिष्ठ नेत्यांना भेटणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे यात काहीही गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.