Mahavistar AI App: शेती करताना हवामान, बाजारभाव, कीड-रोग, अनुदान योजना आणि सरकारी प्रक्रियांची माहिती वेळेवर मिळणं हे आजच्या काळात सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. याच गरजेला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी सुरू केलं असून, हे ॲप शेतीत डिजिटल क्रांती घडवणारं साधन ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेलं हे ॲप शेतकऱ्यांसाठी एक विश्वासू डिजिटल मार्गदर्शक बनत आहे.
आजपर्यंत कृषी विभागाच्या योजना, पीक विमा, अनुदान किंवा अर्जांची माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. मात्र ‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे ही सर्व माहिती आता मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. ॲपमध्ये मराठी भाषेतील सोप्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील शेतकरीही या तंत्रज्ञानाचा सहज वापर करू शकतात.
या ॲपमध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, कडधान्ये, तेलबिया, कापूस, ऊस, भाजीपाला, फळपिके आणि मसाला पिकांसाठी शास्त्रोक्त शेती पद्धतींची माहिती देण्यात आली आहे. पूर्व मशागत, योग्य बियाण्यांची निवड, पेरणीची वेळ, खत व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, कापणी आणि साठवणूक याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्यामुळे अनुभवावर अवलंबून असलेली शेती आता विज्ञानाधिष्ठित होत आहे.
‘महाविस्तार एआय’ ॲपमधील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्मार्ट रोगनिदान प्रणाली. शेतकरी आपल्या पिकावर दिसणाऱ्या रोग किंवा किडीचा फोटो अपलोड करताच एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे निदान होते आणि त्यावर योग्य उपाय सुचवले जातात. यामुळे चुकीच्या औषधांचा वापर टाळता येऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते.
ॲपमध्ये अचूक हवामान अंदाजाची सुविधाही देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील रिअल-टाइम हवामान माहितीनुसार पेरणी, फवारणी किंवा कापणीचे निर्णय घेणे शेतकऱ्यांना सोपे झाले आहे. याशिवाय खत मात्रा गणकाच्या माध्यमातून जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ आणि माती परीक्षण अहवालानुसार योग्य खतांचे प्रमाणही सहज समजते.
शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधणारा एआय चॅटबॉटही ॲपमध्ये उपलब्ध आहे. तसेच स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे अद्ययावत बाजारभाव पाहता येत असल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणे शक्य होत आहे.
गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असलेले ‘महाविस्तार एआय’ ॲप अधिकाधिक शेतकरी, महिला लाभार्थी आणि तरुणांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सक्षम, सुरक्षित आणि नफेखोर बनवण्याच्या दिशेने ‘महाविस्तार एआय’ हे एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे.