Polymer Notes : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देशातील नवीन चलनी नोटांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. मध्यवर्ती बँक पुढील आर्थिक वर्षाच्या (FY28) सुरुवातीस, म्हणजेच साधारण एप्रिल 2027 पर्यंत अधिक टिकाऊ अशा पॉलिमर (प्लास्टिक) चलनी नोटा चलनात आणण्याच्या योजनेवर काम करत आहे. या नवीन नोटा प्रामुख्याने कमी मूल्याच्या चलनासाठी तयार केल्या जातील, कारण दैनिक वापरामुळे कागदी नोटा लवकर खराब होतात आणि फाटतात.
30 वर्षांहून अधिक काळ जगभरात वापर आणि जलरोधक स्वरूप
पॉलिमर नोटांचे वैशिष्ट्य सांगताना गव्हर्नर यांनी स्पष्ट केले की, जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून अशा प्रकारच्या नोटांचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. या प्लास्टिक नोटा पाणी, घाम आणि घाणीमुळे खराब होत नाहीत तसेच त्या सहज फाटत नसल्याने त्यांचे आयुष्य नेहमीच्या कागदी नोटांपेक्षा खूप जास्त असते. यामुळे जुन्या नोटा बदलण्यावर होणारा आरबीआयचा मोठा वार्षिक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.
महागाईचे 4 टक्क्यांचे उद्दिष्ट आणि व्याजदरातील बदल
अर्थव्यवस्थेच्या इतर मुद्द्यांवर बोलताना गव्हर्नर यांनी स्पष्ट केले की, भविष्यातील व्याजदरांशी संबंधित सर्व निर्णय हे येणाऱ्या आर्थिक आकडेवारीवर अवलंबून असतील. मध्यवर्ती बँकेचे मुख्य प्राधान्य मध्यम कालावधीत महागाई 4 टक्क्यांच्या उद्दिष्ट पातळीपर्यंत खाली आणणे हेच राहील.
हेही वाचा – Shocking! मोबाईल गेमच्या व्यसनापायी 13 वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?
रुपयाची स्थिती आणि FCNR(B) योजनेबाबत स्पष्टीकरण
परकीय निधीचा ओघ सुरू असताना रुपयाच्या मूल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, जागतिक भू-राजकीय तणाव कमी झाल्यास भारतीय रुपयात अधिक मजबूती दिसून येऊ शकते. आरबीआय रुपयाच्या मूल्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय 'फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट म्हणजेच FCNR(B) योजनेतील निधीचा ओघ समाधानकारक असून, ही योजना मुदतीपूर्वी बंद करण्याचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.