फ्रान्सची प्रसिद्ध टायर उत्पादक कंपनी मिशेलिनने भारतात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने चेन्नईतील आपल्या कारखान्यातून पहिल्यांदाच भारतात तयार केलेला प्रीमियम पॅसेंजर कार टायर सादर केला आहे. या निर्णयामुळे मिशेलिनची भारतीय बाजारपेठेतील उपस्थिती आणखी मजबूत झाली असून 2026 च्या पहिल्या सहामाहीत हे टायर संपूर्ण देशभर उपलब्ध होतील.
या नवीन उत्पादन लाईनसाठी कंपनीने 686 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या 564 कोटी रुपयांच्या योजनेचा हा विस्तार असून, याशिवाय चेन्नई प्रकल्पात यापूर्वीच 2,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या टायर रेंज विशेषतः 16 ते 22 इंच आकाराच्या प्रीमियम विभागासाठी तयार करण्यात आली आहे.
चेन्नईतील या कारखान्यातून जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेले LTX Trail ST, Pilot Sport 4 SUV, Pilot Sport 5 आणि Primacy 5 या मालिकेतील टायर तयार केले जातील. यापैकी पहिला टायर म्हणून Primacy 5 उत्पादन लाईनवरून बाजारात आला आहे.
भारताची पॅसेंजर वाहन बाजारपेठ 2024 मध्ये 18.13 अब्ज डॉलर्स इतकी होती. 2030 पर्यंत ती जवळपास दुप्पट म्हणजे 33.85 अब्ज डॉलर्स होईल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. SUV वाहनांची मागणी अर्ध्याहून अधिक असल्याने मोठ्या आकाराच्या व प्रीमियम टायरांसाठी प्रचंड संधी असल्याचे मिशेलिनचे मत आहे. वाढते उत्पन्न, सुधारित रस्ते आणि ग्राहकांची बदलती आवड हे घटक उच्च-गुणवत्तेच्या टायरांसाठी पोषक ठरत आहेत.
या विस्ताराला पूरक म्हणून कंपनी आपली रिटेल नेटवर्क वाढवत आहे. सध्या मिशेलिनचे देशभरात 75 स्वतंत्र टायर व सेवा केंद्रे आहेत. अलीकडेच कंपनीने नाशिकमध्ये पहिले एक्सपिरियन्स स्टोअर सुरू केले आहे.
चेन्नईतील मिशेलिनचा कारखाना केवळ भारतातील प्रमुख सुविधा नसून सस्टेनेबिलिटी व ऑटोमेशनच्या बाबतीत जागतिक स्तरावर आदर्श मानला जातो. येथे आधीच ट्रक, बस आणि संरक्षण क्षेत्रासाठी 38 प्रकारचे टायर तयार केले जातात. सर्व बी2बी टायर RFID-सक्षम आहेत. शून्य द्रव उत्सर्जन, 100% रिसायकलिंग, 45% नूतनीकरणक्षम ऊर्जा वापर आणि पावसाचे पाणी साठवण यामुळे हा प्रकल्प पर्यावरणपूरक ठरतो.
नवीन प्रवासी टायर उत्पादन लाईन ही भारतातील सर्वाधिक स्वयंचलित सुविधा मानली जाते. येथे फक्त 200 कर्मचाऱ्यांद्वारे उत्पादन सुरू आहे, जे सामान्यतः 500 कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे. अत्याधुनिक रोबोटिक्स व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प फक्त 12 महिन्यांत पूर्ण झाला असून, यासाठी कर्मचाऱ्यांना परदेशातील मिशेलिन कारखान्यांमध्ये 50,000 तासांचे प्रशिक्षण देण्यात आले.