बिहार: देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलनाची लाट उसळलेली असताना दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून एक वेगळीच आणि भावनिक कहाणी समोर आली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या दोन तरुण-तरुणींची ओळख मैत्रीत बदलली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर दोघांनी लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात केली. या अनोख्या प्रेमकहाणीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मोहन श्रीवास्तव हा नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आला होता. अनेक दिवस सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्याची ओळख दिल्लीतील एका तरुणीशी झाली. ती देखील नीट परीक्षेशी संबंधित प्रश्नांमुळे आंदोलनात सहभागी झाली होती.
आंदोलनाच्या काळात दोघांमध्ये संवाद वाढत गेला. सुरुवातीला आंदोलनस्थळी एकमेकांना मदत करताना त्यांची मैत्री झाली. आंदोलनाच्या ठिकाणी जेवण-पाण्याची गैरसोय असताना संबंधित तरुणी मोहनसाठी नियमित खाण्यापिण्याची व्यवस्था करत होती. याच छोट्या-छोट्या प्रसंगांमधून दोघांमधील जवळीक वाढली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईत मोहन जखमी झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित तरुणीने त्याची काळजी घेतली आणि उपचारादरम्यान त्याच्यासोबत राहिली. या काळात दोघांनाही एकमेकांविषयीच्या भावना अधिक स्पष्ट झाल्या. अखेर त्यांनी आपले प्रेम स्वीकारत विवाह करण्याचा निर्णय घेतला.
दोघांनी मंदिरात साध्या पद्धतीने विवाह केल्याची माहिती समोर आली असून, या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण या प्रेमकहाणीला "नीट आंदोलनातील सर्वात वेगळी घटना" असे म्हणत शुभेच्छा देत आहेत. तर काहींनी आंदोलनाच्या वातावरणातही अशी प्रेमकहाणी घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
मात्र, या विवाहानंतर कौटुंबिक पातळीवर काही अडचणीही निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबीयांकडून या नात्याबाबत अद्याप पूर्ण स्वीकार मिळालेला नसल्याचे वृत्त आहे. तरीही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
देशभरात आंदोलन, राजकारण आणि पेपरफुटीच्या चर्चांमध्ये ही वेगळी प्रेमकहाणी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. संघर्षाच्या वातावरणात सुरू झालेली ही ओळख आता आयुष्यभराच्या नात्यात बदलली असून, सोशल मीडियावर या जोडप्याच्या कहाणीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत