New Nomination Rules: देशातील बँकिंग क्षेत्रात आता एक महत्वाचे बदल होणार आहे. केंद्र सरकारने ग्राहकांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी नवा 'Banking Law Amendment Act, 2025' लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील नवे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून अमलात येणार आहेत. या नियमांमुळे बँक खात्यांमधील नॉमिनेशन प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे.
नव्या नियमानुसार, आता ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात केवळ एक नव्हे तर चारपर्यंत नॉमिनी ठेवण्याची मुभा मिळणार आहे. प्रत्येक नॉमिनीचा हिस्सा खातेदार स्वतः ठरवू शकणार असून, एकूण वाटा 100 टक्के पर्यंत असेल. म्हणजेच, एका नॉमिनीला 40 टक्के, दुसऱ्याला 30 टक्के, तिसऱ्याला 20 टक्के आणि तिसऱ्याला 10 टक्के असा वाटा निश्चित करता येईल. या बदलामुळे खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदारांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होईल आणि दावा प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
हेही वाचा: EPFO News: ईपीएफओचे नवे नियम लागू! कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पेन्शन आणि निधी काढणे अधिक सोपे
अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाचा उद्देश बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता आणि ग्राहकांचा अधिकार वाढवणे हा आहे. आतापर्यंत एकाच नॉमिनीला परवानगी असल्यामुळे अनेकदा इतर वारसांना हक्क मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत होत्या. आता नव्या नियमामुळे ही प्रक्रिया सुकर होणार आहे.
याशिवाय, लॉकरसाठी सरकारने ‘सिक्वेन्शियल नॉमिनेशन’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की, पहिला नॉमिनी मृत झाल्यासच पुढील नॉमिनीला त्या लॉकरचा हक्क मिळेल. सर्व नॉमिनींना एकाच वेळी हक्क नसेल. ही प्रणाली लॉकर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक विश्वासार्ह ठरणार आहे.
या सुधारणा Banking Law Amendment Act, 2025 अंतर्गत करण्यात आल्या असून, यात 19 महत्त्वपूर्ण नियम बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहक संरक्षण, बँक ऑडिट सुधारणा, गुंतवणूकदार सुरक्षेला बळकटी, आणि रिपोर्टिंग प्रणाली एकसमान करणे यांसारखे मुद्दे समाविष्ट आहेत.
हेही वाचा: Post Office Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा 5,500 रुपये! योजना या लोकांसाठी ठरतेय वरदान
सरकारने स्पष्ट केलं आहे की, लवकरच 'Banking Companies (Nomination) Rules, 2025' स्वतंत्रपणे जाहीर केले जातील. या नियमांमध्ये नॉमिनी जोडणे, बदलणे किंवा रद्द करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांना अधिक स्पष्टता आणि नियंत्रण मिळेल.
या बदलांमुळे बँकिंग क्षेत्रात ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन (Customer-Centric Approach) अधिक मजबूत होईल. प्रत्येक खातेदाराला आपल्या मालमत्तेचे संरक्षण आणि मृत्यूनंतर कुटुंबाला योग्य दावा मिळावा, हा या सुधारणांचा मुख्य हेतू आहे.
फक्त काही दिवसांवर हे नवे नियम लागू होत असल्याने, बँक ग्राहकांनी आपल्या खात्यांची नॉमिनी माहिती तपासून आवश्यक बदल वेळेत करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.